ंनाशिक, दि. १४ : स्वातंत्र्य मिळूनही काही गोष्टी पाय रोवून असल्याने देशाच्या प्रगतीत मोठा अडसर निर्माण होत आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार ही देशाला लागलेली किड असून, जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होणार नाही, तोपर्यंत भारताला विकसित देशांच्या रांगेत स्थान मिळणार नसल्याच्या प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केल्या. स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभुमीवर विविध महाविद्यालयातील तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी ‘आम्हाला भ्रष्टाचारमुक्त भारत हवाय’ अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, रोजगार व दर्जेदार शिक्षणास प्राधान्य दिल्यास भारताला महासत्तेचे स्वप्न साकार होणे सहज शक्य होईल. भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीतील अडथळाभ्रष्टाचार हाच देशाच्या प्रगतीतील महत्त्वाचा अडथळा असल्याचे तरुणांनी नमुद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्ण स्वातंत्र्य, प्रत्येकाला सर्व पायाभूत सुविधांची उपलब्धता, खंडणीमुक्त समाज ही काळाची गरज बनली आहे. भ्रष्टाचारामुळे संबंध देशाला पोखरले जात असल्याने मायभूमीवर उत्कट प्रेम व निष्ठा असूनही तरु णांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी योग्य दिशा सापडत नाही. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीला देखील अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारत झाल्यास देशाच्या प्रगतीतील अडथळे दुर होतील. त्याचबरोबर जगाच्या नकाशावर भारताची स्वच्छ व सुंदर प्रतिमा होईल यात काहीच दुमत नसल्याचे तरुणांनी सांगितले. चला संकल्प करूया...देशाला विकसित देशांच्या रांगेत स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न करायला हवे. देशात या सुधारणा व्हाव्यात असे उपदेश न देता आपणच एक उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असेही तरुणांनी सांगितले. याबाबत संदीप तायडे यांने, भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला हवा, देशात पायाभूत सुविधा असायला हव्यात तसेच रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात असे संगळ्यांकडूनच सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात आपण देशाचा उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करतो काय? याबाबत आत्मपरिक्षण करायला हवे. इतरांना उपदेश न देता आपल्यापासूनच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावण्यासाठी प्रयत्न केल्यास आपणास २०२० च्या अगोदरच महासत्ता देशांच्या रांगेत स्थान मिळेल. त्यामुळे स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील तमाम तरुणांनी संकल्प करून चांगल्या कामासाठी प्राधान्य द्यायला हवे. नुसतेच उपदेश देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आपण देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावायला हवा असेही संदीपने सांगितले.
आम्हाला हवाय भष्ट्राचार मुक्त भारत
By admin | Published: August 14, 2014 10:18 PM