नाशिक : बाबांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यास सुरुवात केल्याने आमच्या कुटुंबालाही त्याकाळी समाजाने वाळीत टाकले होेते, असा गौप्य स्फोट पद्मश्री मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीत केला.येथील रावसाहेब थोरात सभागृहात नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा डॉ. प्रकाश आमटे व सौ. मंदाताई आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीत डॉ. प्रकाश आमटेंनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर त्यांच्या कुटुंबिक आठवणींना उजाळा दिला. बाबा आमटे हे नियम व शिस्तीचे पक्के होते. त्यांना नियम व शिस्त मोडलेली आवडत नव्हती. नियम व शिस्त मोडली, तर सार्वजनिक ठिकाणी शिक्षा ही ठरलेलीच होती. एकदा विकासने पाहुण्यांकडून आलेल्या वस्तुला उघडून पाहिले, त्याचा राग येऊन विकासला बाबांनी सर्वांसमक्ष सार्वजनिक ठिकाणी शिक्षा केली. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा निर्णय बाबांनी घेतला तेव्हा, आमच्या नातलगांनी व समाजानेही त्यांना हा मूर्खपणा आहे, असे म्हणत आमच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. त्याही परिस्थितीत बाबांनी त्यांचे समाजसेवेचे व्रत सोडले नाही. त्याकाळी कुष्ठरोगाबाबत प्रचंड गैरसमज असल्याने बाबांना या रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळत नव्हते. तेव्हाच ठरविले आपणही डॉक्टर होऊन बाबांचे हे कार्य पुढे चालू ठेवायचे. प्रकट मुलाखतीत विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. प्रकाश आमटेंनी तितक्याच हजरजबाबी उत्तरे देत उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. भूषण वाणी यांनी केले, तर प्रकट मुलाखत डॉ. मनीष जोशी व डॉ. प्रणिता गुजराथी यांनी घेतली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाचे राज्य सचिव शैलेश निकम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, तसेच निमाचे पदाधिकारी डॉ. राहुल पगार, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. अनिल निकम आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच निमाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यावेळी कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली. त्यात प्रामुख्याने नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. भूषण वाणी यांनी, तर महिला संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी स्वीकारली. त्याचवेळी नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. (प्रतिनिधी)
आम्हालाही वाळीत टाकले होते
By admin | Published: January 25, 2015 12:00 AM