राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. शहरातील नागरिकांचे व्यवसाय सुरू ठेवावेत. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल. कोरोनासोबत जगणे शिकावे लागेल. महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी प्रामाणिकपणे कामकाज करीत आहेत. आरोग्य यंत्रणा चांगली असताना मालेगाव मध्यचे आमदार माैलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यावर नाकर्तेपणाचा आरोप करीत माजी महापौर रशीद शेख म्हणाले की, रुग्णालयांची पाहणी करण्यापेक्षा शहराच्या स्थितीबाबत व अधिकच्या सिलेंडरसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करणे गरजेचे आहे. सामान्य रुग्णालयात सोय सुविधा नसताना डॉ. किशोर डांगे यांचे कौतुक करणे हास्यास्पद आहे. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्याकडून रुग्णांबाबत दुजाभावाची भूमिका दिसून येत आहे. मनमाड, नांदगाव, कळवण, सटाणा कुठलेही रुग्ण मालेगावी उपचार घेऊ शकतात. याला माैलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी घेतलेली हरकत निषेधार्ह असल्याची टीका माजी महापौर शेख यांनी केली. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्याकडून आयुक्तांच्या बदलीला स्थगिती देण्याचे प्रकारही केले जात आहेत. भ्रष्टाचारी, जनतेची व मनपाची तिजोरी लुटणाऱ्या आयुक्ताला पाठीशी घातले जात आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव पाठक हे देखील मदत करीत आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून अपेक्षा असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, शासनाने आयुक्त कासार यांचीच नियुक्ती केली तर आक्रमक भूमिका घेतली जाईल, अशी माहिती महापौर शेख, माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्तांना पाठीशी घातल्यास आक्रमक भूमिका घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:15 AM