नाशिक : गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दिवसेंदिवस हल्ले होण्याचे प्रकार वाढत असून, पोलीस यंत्रणा हे हल्ले रोखण्यास असमर्थ ठरत असल्याने आता गोरक्षकांनाच स्वसंरक्षणासाठी शस्त्रे हाती द्यावीत, यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.देशातील गायींच्या बाबतीत हिंदू समाजाच्या भावनिकतेचा विषय आहे. त्यामुळे गोवंशाची हत्त्या थांबविण्यासाठी अनेक राज्यांत कायदे करण्यात आले होते. राज्यातही कायदा करण्यात आला आहे. मात्र तरीही चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच असून, मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी केली जाते. त्याला विरोध करणाऱ्यांवर हल्ले केले जातात. कर्नाटकात पशुवधगृह बंद पाडल्याच्या कारणावरून गोरक्षक कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची हत्त्या करण्यात आली. तर हरियाणा येथे गोशाळा चालविणाऱ्या संदीप कटारिया यांच्यावर आणि पुण्याततील मिलिंद एकबोटे यांच्यावर हल्ला करण्यात आला आला. अनेक गोवंशाची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर ट्रक घालणे किंवा अन्य शस्त्रांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही ठिकाणी पोलीस यंत्रणा हतबल ठरते, अनेक ठिकाणी पोलीस अर्थकारणाला बळी पडतात. त्यामुळे आता स्वसंरक्षणासाठी गोरक्षकांना शस्त्रे पुरवावीत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने गृह खात्याकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शशीधर जोशी, शैलेश पोटे, रूपाली जोशी, मंजूषा जोशी, पुरोहित यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गोरक्षण करणाऱ्यांना हवीत शस्त्रे
By admin | Published: November 30, 2015 10:50 PM