नाशिक : आरटीओ अधिकाºयाचा लॉगइन आयडी व पासवर्ड हॅक करून व्यावसायिक वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र देणारा आरटीओ लिपिक संशयित परितोष रणभोर याने मार्च २०१७ पासून ६८६ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे़ या वाहनमालकांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यावसायिक वाहने तपासणी निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांचा लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून आरटीओ लिपिक संशयित परितोष रणभोर याने तपासणीसाठी न आणताच १३ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते़ या प्रकरणी हेमाडे यांनी १९ आॅगस्ट २०१७ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणी रणभोरला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती़ प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या तपासणीत मार्च २०१७ पासून संशयित रणभोर याने ६८६ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे़ या वाहनधारकांना तुमच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ या नोटिसीला अनेक वाहनमालकांनी उत्तर दिलेले नाही, तर काही नोटिसा या बटवडा न होता कार्यालयात परत आल्या आहेत़ संशयित रणभोरकडून बनावट योग्यता प्रमाणपत्र प्राप्त करणाºया वाहन क्रमांकाची यादी कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित वाहनधारकांनी खुलासा करण्याचे आवाहन कळसकर यांनी केले आहे़
संकेतस्थळ हॅकिंग; ६८६ बनावट प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:22 AM