अमोल अहिरे/ जळगाव निंबायती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील वाढती गर्दी कोरोनाला आयते निमंत्रण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ झाला. गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांवर ठरलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली होती. मात्र सध्या विवाह सोहळ्यांमधील व-हाडी मंडळींचा उत्साह व वाढती गर्दी चिंतेचा विषय बनला आहे. लाॅकडाऊन उठवल्यानंतर लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. मास्क आणि शारीरिक अंतराबाबत शासनाच्या सूचनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच कोरोनाची लक्षणे दिसत असतानादेखील चाचणी करून न घेणे तसेच याबाबत प्रशासनाला न कळविणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष हे आगामी काळात कोरोनावाढीचे एक कारण होऊ शकते.शासनाची नियमावली कागदावरच...लग्नसमारंभाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची मर्यादा ५० वरून आता १०० करण्यात आली आहे. त्यात वधू-वर दोन्ही पक्षाकडील नातेवाईक मंडळींसह वाजंत्री, भटजीपासून आचारी आणि मदतनीस या सगळ्यांची गणना करून १०० संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी लग्न सोहळ्यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची अट घालण्यात आली आहे. समारंभाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मोबाइल नंबर आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन घालण्यात आले असून, उपस्थितांचे निर्जंतुकीकरण करून शरीरातील तपमान मोजणारी यंत्रणा प्रवेशद्वारावरच उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय लग्नाच्या पंक्तीत प्रत्येकी सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर जेवणाऱ्यांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत. ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांची भरारी पथके नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे; मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.
विवाह सोहळ्यातील गर्दी देईल कोरोनाला ‘वर्दी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:29 AM