नाशिक : लग्न सोहळा म्हटलं की बँड-बाजा, वरात, जेवणाची पंगत, कपडे, दागिने व विविध वस्तूंची खरेदी आलीच. मात्र, वाढत्या महागाईमुळे ही खरेदी करताना सर्वसामान्यांना आता काहीसा आखडता हात घ्यावा लागत आहे. तर, आर्थिक संपन्नता असलेल्यांकडून महागाईतही लग्नाचा बार धूमधडाक्यात उडवला जात आहे. महिनाभर लग्नाच्या तिथी नसल्याने बंद असलेल्या विवाह सोहळ्याचा आता धूमधडाक्यात बार उडत आहे. कोरोनाकाळात अनेक निर्बंध असल्याने अनेकांनी लांबणीवर टाकलेले विवाह सोहळे आता अमाप गर्दीत पार पडत आहे. मात्र, किराणा माल, सोने, कपडे व इंधनदरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे विवाहाचे बजेट कोलमडत आहे, तर आर्थिक स्थिती चांगली असलेल्यांचे सोहळे थाटात पार पडत आहे.
विवाह मुहूर्त २०२२
एप्रिल : २२, २३, २७, २८.
मे : २, ३, ४, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १७, १८, १९, २०, २१, २४, २५, २६, ३१.
जून : १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, २१, २२, २३.
जुलै : २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०.
जेवणाचा खर्च वाढला. किराणा मालातील खाद्यतेल, मसाले, डाळींच्या दरात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून मोठी वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर प्रतिलीटर ४० ते ५० रुपयांनी महागले आहे. त्यातच इंधनवाढीमुळे महागाईत भर पडत आहे.
मंगल कार्यालयांची सुपारी कडक
एका क्षेत्रातील महागाईचा दुसऱ्या क्षेत्रावरदेखील परिणाम होतो. विविध गोष्टी महागल्याने मंगल कार्यालयचालकांनादेखील नाइलाजाने दरवाढ करावी लागत आहे. त्यामुळे विवाह बजेटचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.
कपड्यांचा बस्ता महागला
कापूस आणि इतर कच्च्या मालाचे दर वाढल्याने त्याचा परिणाम कापड बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लग्नसराईतील बस्त्यांची बिले लाखांपर्यंत पोहोचत आहे.
सोने आवाक्याबाहेर
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहे. दोन महिन्यांत दरात प्रतितोळा चार ते पाच हजारांची वाढ झाली असून ५३ हजार रुपये भाव मिळत आहे.
उन्हाचा वाढता कडाका आणि वातावरणबदलामुळे पावसाच्या शक्यतेने मे, जून महिन्यांत मंडपाऐवजी मंगल कार्यालय किंवा लॉन्समध्येच विवाह सोहळा करण्यावर भर देतात. मार्च महिन्यात लग्नाच्या तिथी नव्हत्या. त्यामुळे अनेकांनी एप्रिल, मे महिन्यांतील तिथींना विवाहाचे नियोजन केले असून बुकिंग झाले आहे.
- प्रसाद गलांडे, मंगल कार्यालय व्यवस्थापक
मंगल कार्यालयांच्या तारखा बुक
एप्रिल महिन्यात लग्नाच्या ४ तिथी, मे महिन्यात १९ तर जून महिन्यात १७ तिथी आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मंगल कार्यालये आणि लॉन्स बुकिंग करून ठेवले जात आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांतील सर्व तारखा बुक झाल्या आहेत.