वणी : दिंडोरी तालुक्यातील बहुतांशी द्राक्षबागा द्राक्षखुडणीनंतर रिकाम्या झाल्या असून, द्राक्षबागांच्या खरड छाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. तालुक्यात शेंडाबळीच्या कामांना वेग आला आहे. द्राक्षवेलींची फूट सहा पानावर गेली, तर सबकेन नावाची प्रक्रिया करण्यात येते, तर चौदा पानावर गेल्यानंतर शेंडा मारण्याची प्रक्रिया करण्यात येते. शेंडाबळी बगलफूट काढणे आदी कामांचा समावेश यात असतो. बागेस तणमुक्त करणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे, एनपीडीचा समतोल आहार देणे, सेंद्रीय खते घालणे, जमीन माती परीक्षण करणे या अनुषंगिक बाबींचीही पूर्तता करावी लागते. वेल सक्षम राहण्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, उत्पादनवाढीचे नियोजन आखून ही सर्व कामे सुरू असून, द्राक्ष उत्पादक व्यस्त झाले आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने द्राक्षबागेच्या मुळाशी ओलावा टिकून राहण्यासाठी कोकोपीठ म्हणजेच नारळाच्या शेंड्यांची प्रक्रिया केलेली पावडर पाण्यात एकत्रित करून टाकण्यात येत आहे. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता यात असते व सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या टवटवीतपणाबरोबरच दर्जावाढीसाठी हा प्रयोग करण्यात येत आहेत. भूतकाळात गुळाचे पाणी द्राक्षबागेच्या मुळांना देण्याचाही प्रयोग करण्यात आला होता, तर काहींनी खाण्याचा सोडाही मुळाशी टाकून नवीन प्रयोग केला होता. दरम्यान, शेंगदाणा पेंड हे एक उत्तम व दर्जेदार खाद्य द्राक्षमुळांना मानण्यात येते. मात्र, तुलनात्मकरीत्या ते महाग पडते व उत्पादकांना ते परवडत नसल्याने कोकोपीठचा वापर उत्पादक करत आहेत.
----------------
मजुरांचा तुटवडा
खरड छाटणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. पेठ सुरगाणा तालुक्यातील मजुर हे काम मोठ्या प्रमाणावर करायचे. मात्र, ते आपल्या भागात निघून गेल्याने स्थानिक मजुरांकडून ही कामे करण्यात आली. मजुरीच्या दरातही फरक पडत असल्याने, आधीच मेटाकुटीला आलेला उत्पादक अडचणीत सापडला आहे. कोरोनामुळे शेतकरी व कुटुंबीयांच्या सदस्यांनी खरड छाटणीची कामे पूर्ण केली व आता द्राक्षबागांच्या शेंडाबळीची कामे सुरू आहेत. पूर्व भागापेक्षा पश्चिम पट्ट्यात खरड छाटणीच्या काम पूर्ण झाले आहे.