नाशिक : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये, बॅँकांना सुटी व रविवारची साप्ताहिक सुटी असल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड’ वर्षासहलीने साजरा करणे पसंत केले. यामुळे शहराजवळील ‘वन-डे ट्रीप’ची पर्यटनस्थळे गजबजली होती. शनिवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककरांनी वीकेण्डला पावसाळी पर्यटनाचा बेत आखला होता. काही नागरिक शनिवारीच पर्यटनासाठी बाहेर पडले तर काहींनी रविवारच्या सुटीची धमाल केली. दरम्यान, शहराजवळची पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली होती. नाशिककरांच्या आवडीचे डेस्टिनेशन असलेले सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्यावर नागरिकांची जणू जत्रा भरल्याचे चित्र होते; कारण या हंगामात प्रथमच दूधसागर धबधबा रविवारी सकाळपासून खळाळत होता. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने धबधब्याचे पाणीही कमी झाले होते. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दूधसागर धबधब्याच्या परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. तसेच त्र्यंबकेश्वर, हरसूल-वाघेरा घाटमार्ग, पहिने-पेगलवाडी रस्ता, इगतपुरीजवळील भावली धरण परिसर, अशोका धबधबा, नांदूरमधमेश्वर या भागात पर्यटकांची गर्दी दिसून आली. भावलीच्या गायवझरा, सुपवझरा धबधब्यासह नागरिकांनी अशोका धबधब्याजवळही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. इगतपुरी- घोटी पोलीस ठाण्यांच्या वतीने पर्यटनस्थळांभोवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रविवारी दिवसभर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला होता. पर्यटकांची त्र्यंबकेश्वरसह भावली परिसरात एकच गर्दी लोटल्यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पहावयास मिळाले. पर्यटकांची वाहने आणि प्रवासी वाहतूक यामुळे पर्यटनस्थळांभोवती रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. यामुळे त्र्यंबक -घोटी मार्गासह पहिने-पेगलवाडी शिवारातही वाहनकोंडी झाली होती.भावली-भंडारदरा सहलवीकेण्डच्या निमित्ताने पावसाळी सहलीसाठी बहुतांश नागरिकांनी भावली-भंडारदरा असा वन-डे ट्रीपचा बेत आखून पावसाच्या सरींमध्ये ओलेचिंब होत या भागातील धबधब्यांजवळ मनमुरादपणे पर्यटनाचा आनंद लुटला. भावली गावापासून भंडारदराकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे अनेकांनी मधल्या रस्त्याचा पर्याय निवडत भंडारदरा गाठले. गर्द हिरवाईने नटलेल्या भंडारदरा भागातील धबधब्यांनी नागरिकांची मने जिंकली.
वर्षासहलीने साजरा ‘वीकेण्ड’ : पर्यटनस्थळे गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:58 AM