नाशिक : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे नाशिकला निर्बंधातून दिलासा मिळणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू असताना निर्बंध जैसे थे राहाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याने नाशिककरांचा हिरमोड झाला. राज्य शासनाकडून आदेश प्राप्त झाले नसल्याने शनिवार, रविवारचा वीकेंड लॉकडाऊन नेहमीप्रमाणेच राहाणार आहे.
जिल्ह्याला निर्बंधातून काही प्रमाणात दिलासा मिळावा असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे दुकानांची वेळ वाढविण्याबरोबरच वीकेंड लॉकडाऊनमध्येदेखील दिलासा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. राज्य शासनाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर दिलासा मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत नाशिकचाही समावेश असल्याचे सांगण्यात आल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
जिल्हा निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांच्या बैठकीत होण्याची नाशिककरांना अपेक्षा होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाकडून अधिकृत कोणतेही आदेश नसल्याने आणि शिथिलतेबाबतचा निर्णय केवळ टास्क फोर्स समितीच घेऊ शकत असल्याने कोणतीही घोषणा होऊ शकली नाही.
या निर्णयामुळे नाशिककरांची मात्र निराशा झाली. व्यापारीवर्गाचेही पालकमंत्र्यांच्या घाेषणेकडे लक्ष होते. वीकेंड लॉकडाऊन उठल्याचीदेखील अफवा दिवसभर पसरली होती. जिल्ह्यातील निर्बंध कायम असल्याचे जाहीर करण्यात आल्याने सायंकाळी सर्वांचाच हिरमोड झाला.
-- कोट--
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच कायम ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनमध्ये तूर्तास कोणताही बदल झालेला नाही. शासनस्तरावरून नव्याने निर्देश आल्यास ते जिल्ह्यात लागू करण्यात येतील.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी