नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे या ठिकाणी अनेक कामगारांची वर्दळ असते. दर शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात परिसरातील शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार दुकाने थाटतात. यामुळे या ठिकाणी दर शनिवारी मोठी गर्दी होत असल्यामुळे सरपंच शरद सोनवणे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाचे पालन करत दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्तता करण्यासाठी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे आदीं सूचनाचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना यावेळी केले आहे.नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शासनाच्या आदेशानुसार गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरी परिसरातील शेतकरी, दुकानदार यांनी गर्दी न करता घरीच थांबून काळजी घ्यावी.- शरद सोनवणे, लोकनियुक्त सरपंच, गोंदे दुमाला.