नाशिक : शहरात मराठा आंदोलनामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला असताना बुधवारचा आठवडे बाजार मात्र सुरळीत सुरू होता. दूरवरून आलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने थाटली होती. गोदाघाट ते गणेशवाडी रस्त्यावर विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने थाटली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बुधवारच्या आठवडे बाजारातील व्यवहारावर परिणाम झालेला होता. आंदोलनातही बुधवार बाजारात ग्राहकांचीही गर्दी झाल्याचे दिसून आले. मराठा क्रांती मोर्चामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने सकाळापासूनच गावात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बाजार भरतो की नाही अशी परिस्थिती असताना दुपारनंतर आंदोलन शिथिल करण्यात आल्याने बाजारात नेहमीप्रमाणे वर्दळ झाली. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला माल आणण्यात आला होता तर नेहमीप्रमाणेच गोदाघाटाच्या कडेला आणि गणेशवाडी मार्गावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी नेहमीप्रमाणे शेतमाल घेऊन आले होते. स्थानिक दुकानदारांनीदेखील दुपारी आपली दुकाने थाटली. धान्य बाजारावर मात्र बंदचा परिणाम दिसून आला. आठवडे बाजारातील धान्य बाजारात नेहमीपेक्षा कमी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. काहींनी चारचाकी वाहनांमध्येच धान्याची पोती आणली होती. कापड विक्रेत्यांनीही बाजाराकडे पाठ फिरविली. मात्र भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने नेहमीप्रमाणेच गजबली होती.
आंदोलनातही बुधवारचा आठवडे बाजार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:35 AM