लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होत संप काळात कोणत्याही शेतमालाची विक्र ी करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कळवण तालुक्यातून गुजरात राज्याकडे जाणारे दूध, भाजीपाला वाहतुकीचे वाहने रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनेने व शिवसेनेने दिला आहे. संप काळात तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय किसान क्र ांती मोर्चा व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी अभोणा येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद केला. तालुक्यातील सर्व गावाचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असून, कळवण शहर व तालुक्यात कोणताच आठवडे बाजार भरू द्यायचे नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी बोलून दाखविली. गुरु वारी जयदर येथील आठवडे बाजार बंद करून शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला. तसेच अभोणा बाजार बंद केल्यानंतर शनिवारी नवी बेजचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. शेतकरी बांधव संपावर असल्याने अभोणा येथील व्यापारी व व्यावसायिक बांधवांनीदेखील बंद पाळून संप शंभर टक्के यशस्वी करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला असल्याचे अभोणा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, भाई दादाजी पाटील, नंदकुमार मराठे यांनी सांगितले. कळवण येथील मंडई दुसऱ्या दिवशीही बंद होती. शेतकरी बांधवांनी दूध वाटप बंद केल्याने दुधासाठी कळवणकरांना भटकंती करावी लागली. गुरु वारी रात्री १ वाजेदरम्यान तालुक्यातून गुजरात राज्याकडे भाजीपाला व फळे वाहतूक करणारी वाहने वरखेडा फाटा, दळवट व जिरवाडे येथ; अडवून माघारी पाठविण्यात आली. काही वाहनचालक शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरीही झाली. वाहने अडविण्यात आल्याचे समजताच अभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फुला यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने जाऊ देण्याची सूचना केली. मात्र शेतकरी बांधव वाहने पुढे जाऊ न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे पोलीस व आदिवासी शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वरखेडा फाटा येथे पोल्ट्री फॉर्मवरील गाडी अडकवून १५०० कोंबड्या पसार करण्यात आल्याचे समजते.
आठवडे बाजार भरू देणार नाहीत
By admin | Published: June 03, 2017 12:53 AM