नाशिक : कर्करोगाशी लढून त्यावर विजय प्राप्त केलेल्यांनी व त्यांची शुश्रुषा करणाऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या वुई राईज या चळवळीव्दारे येत्या रविवारी (दि.२८) कॅन्सर जनजागृतीसाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. दोन वेळा कर्करोगावर मात केलेल्या मूळ नाशिककर पण आता विवाहानंतर लंडनवासी होऊनदेखील नाशिकला उपचार घेतलेल्या तंझीम इनामदार यांच्या संकल्पनेतून आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या पुढाकारातून या वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना तंझीम यांनी माझा परिवार, मित्र व डॉक्टर सतत माझ्यासाठी तत्पर होते हे माझे भाग्य असले तरी समाजातील प्रत्येकालाच असा आधार मिळत नसल्याने जनजागृतीसाठी हा पुढाकार घेतल्याचे सांगितले. कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे व रुग्णांना आशावादी बनविणे हे आमच्या चळवळीचे ध्येय असून माझ्या उपचाराबद्दल तसेच या चळवळीला पाठींबा दिल्याबद्दल डॉ. राज नगरकर व एचसीजी मानवता यांचे आम्ही ऋणी असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच कर्करोग रुग्ण, कर्करोग विजेते व त्यांची शुश्रूषा करणारे या सर्वांप्रती आपले प्रेम, आधार व आदर व्यक्त करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या रनमध्ये आता कोरोनाप्रसारामुळे निमंत्रितांव्यतिरिक्त सर्वांना सहभागी होता येणार नसले तरी ९ वेगवेगळ्या देशांमधील ३० शहरातील धावपटू या व्हर्चुअल रनमध्ये कर्करोग रुग्णांप्रती प्रेम आणि जनजागृती करण्यासाठी सहभागी होणार असल्याचे नमूद केले. यावेळी बोलताना डॉ. नगरकर यांनी महिलांमधील कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करतानाच विविध उपक्रमांव्दारे सातत्याने जनजागृती आणि तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले.