संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.आॅगस्ट क्रांती दिनाला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राष्टÑ सेवा दलाच्या वतीने आॅगस्ट क्रांती जागर यात्रा आज मालेगाव शहरात आली होती. या यात्रेचे या. ना. जाधव विद्यालयात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. खैरनार हे बोलत होते. खैरनार पुढे म्हणाले की, दलितांवर हल्ले होत आहेत. दोन समाजात गोहत्या बंदीवरून नाहक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातले हे वातावरण खेदजनक आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी भावनिक प्रश्नांवर राजकारण केले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे ताब्यात घेतली जात आहेत. आगामी काळात जातीनुसार देशाचे तुकडे होतील. या सर्वांविरुद्ध सेवा दलाने देशभर जनजागरण सुरू केले आहे. नंदुरबार नजीकच्या रावळापाणी या आदिवासी बहुल गावातून यात्रेस ३१ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला आहे. साक्री, मालपूर कासारे, शहादा, धुळे मार्गे ही यात्रा दि. ८ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पोहोचेल. १९४२ च्या आंदोलनात राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. ‘चले जाव’ ही घोषणा युसुफ मेहेरअली या समाजवादी कार्यकर्त्यानेच सर्वप्रथम दिली असल्याची आठवण करून दिली. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे या जागर यात्रेचे मालेगावच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या. ना. जाधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेजीम पथकाच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मार्गे यात्रा नेण्यात आली.यावेळी डॉ. सुगन बरंठ, भास्कर तिवारी, अशोक फराटे, नचिकेत कोळपकर, अशोक पठाडे, संजय जोशी, विकास मंडळ, अनिल महाजन, राजेंद्र भोसले, ज्योती भोसले, जयेश शेलार, दत्ता वडगे, अॅड. जे. आर. अहिरे, स्वाती अहिरे, अल्लाउद्दीन शेख आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत ५५ स्वयंसेवकांसह झांजपथक सामील झाले आहे. शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.