मानोरी (रोहन वावधाने) : स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना आजही अनेक ठिकाणी घडत असून जन्माला येण्याआधीच नवजात मुलीची हत्या करण्यात येत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत असताना येवला तालुक्यातील चिचोंडी येथील खराटे कुटुंबाने मात्र आपल्या कुटुंबात जन्माला आलेल्या एका गोंडस चिमुकलीला जन्म दिल्यानंतर तिचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत करून स्त्री ही कुटुंबातील लक्ष्मी असून तिचा आदर करा, असा संदेश दिला आहे.
चिचोंडी येथील रहिवासी संदीप खराटे व जयश्री खराटे यांनी एका गोंडस बालिकेला जन्म दिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरातील वयोवृद्ध आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल २५ वर्षांनंतर खराटे कुटुंबात मुलगी जन्माला आली असल्याचे सांगितले. २५ वर्षांनंतर कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यानंतर कुटुंबात जणू लक्ष्मी जन्माला आली, असे समजून खराटे कुटुंबाने या नाजुकाला घरात प्रवेश करतेवेळी कुंकुवाचे पाणी करून या चिमुकल्या नाजुकाचे पाय कुंकुवाच्या पाण्यात बुडवून घरात चिमुकलीला चालवत पायाचे ठसे उमटवत घरात प्रवेश केला. यावेळी खराटे कुटुंबीयांनी चिमुकलीला घरात प्रवेश करण्यासाठी अंगणापासून ते घरात जाईपर्यंत विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांच्या आकर्षक पायघड्या तयार केल्या होत्या. तसेच घरात आल्यानंतर चिमुकल्या नाजुकीचे आणि तिच्या आईचे औक्षण करण्यात आले.
------------------
समाजात आजही अनेक ठिकाणी स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी मुलींचे जन्म झाल्यानंतर नवजात अर्भकसुद्धा अज्ञात ठिकाणी टाकून देण्याच्या घटनादेखील घडतात. आजच्या समाजाने मुलगा असो किंवा मुलगी असा कोणताच भेदभाव न करता दोन्हींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पाहिजे. आमच्या कुटुंबात २५ वर्षांनंतर मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तिच्या जन्माचे स्वागत मोठ्या धूमधडाक्यात केले असून तिला आम्ही आमच्या घरची लक्ष्मी मानतो.
------- संदीप खराटे, जयश्री खराटे, चिमुकलीचे आईवडील.
-------------------------------
चिचोंडी येथे चिमुकल्या नाजुकाचे धूमधडाक्यात स्वागत करताना खराटे कुटुंबीय. (२५ मानोरी १/२)
250821\25nsk_8_25082021_13.jpg~250821\25nsk_10_25082021_13.jpg
२५ मानोरी १/२~२५ मानोरी १/२