नांदगाव : दि. 6 नोव्हेंबर...सकाळी ८ वाजेची वेळ.... रेल्वे स्टेशनवर भली मोठी गर्दी जमलेली... जमलेल्यांच्या माना भुसावळच्या दिशेने वळलेल्या....महानगरी थांबणार याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर महानगरीचा थांबा मिळाल्याने नांदगावकरांच्या चेहºयावर आनंद दाटून आला होता. हार तुरे व वाद्यांच्या गजरात महानगरीचे आगमन झाले. तत्पूर्वी रेल्वे स्टेशनच्या फलाटाला एखाद्या सभेचे रूप आले होते. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी खासदारांचे आभार मानले. नगराध्यक्ष राजेश कवडे, कांग्रेसचे तालुका समाधान पाटील, माजी आमदार संजय पवार, शिवसेना तालुका अध्यक्ष सुनील जाधव आदींची भाषणे झाली.प्रास्ताविकांत भाजप तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी लवकरच नवीन मानकानुसार पादचारी पूलाची निर्मिती, अप बाजूच्या फलाटावर शेडची लांबी २५० मीटर व डाऊन फलाटावर १५० मीटरची शेड लवकरच बांधण्यात येणार आहे अशी माहिती दिली. खासदार चव्हाण यांनी थांबा मिळाला आता महसूल वाढला पाहिजे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचेशी वैयिक्तक संबंध असल्याने महानगरीचा थांबा मिळाला असे सांगितले. तसेच अधिकाधिक पास तिकिटे काढून व रेल्वेने प्रवास करून नांदगावचे उत्पन्न वाढवा असे आवाहन केले.सदर थांब्यामुळे जळगाव व नाशिक या ठिकाणी जाणाºया प्रवाशांची सोय झाली आहे. सेवाग्राम (सकाळी ८ वा.) व दुपारी काशी (१२.३० वा.) याच्या मधल्या वेळेत ही गाडी उपलब्ध झाली अशी माहिती प्रवासी प्रवासी संघटनेचे तुषार पांडे यांनी दिली.महानगरीचे चालक एल.बी. सिंग सहचालक आर. के. आर्या, गार्ड झेड.एन.सिंग यांचा खासदार चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवासी संघटनेच्या वतीने तुषार पांडे यांनी मिठाईचे बॉक्स चालकांना दिले. ए.सी.एम शाम कुलकर्णी, वाणिज्य प्रबंधक विवेक भालेराव यांना चव्हाण यांनी डिजिटल दर्शक, सीसीटीव्ही, उद्घोषणा कक्ष यासाठी सुचना केली. स्टेशन प्रबंधक अग्रवाल उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन साळवे यांनी केले.
नांदगावी महानगरीचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 2:33 PM