नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात गरूडझेप शिवज्योत मशाल यात्रेचे स्वागत करण्यात आले. औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका केल्याच्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा ते राजगड अशी शिवज्योत मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील व शिक्षणाधिकारी डाॅ. नानासाहेब पाटील यांनी स्वागत केले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ भेट देऊन पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. ही यात्रा आग्रा येथून निघून नाशिकमार्गे राजगडाकडे मार्गस्थ झाली, या दरम्यान दोन हजार वृक्ष बीजारोपण, ५५ किल्ल्यांवरून घेतलेले जल, आग्रा येथील शिवस्मारकाजवळील माती घेऊन हे शिवप्रेमी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करणार असल्याची माहिती यात्रेच्या संयोजकांनी दिली. यावेळी मोहिमेचे प्रमुख डॉ. संदीप माहिंद तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज ॲड. मारुती गोळे उपस्थित होते.
280821\28nsk_30_28082021_13.jpg
गरुडझेप शिवज्योत मशाल यात्रेचे स्वागतप्रसंगी डॉ. वंसतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मृणाल पाटील समवेत डाॅ.नानासाहेब पाटील, डॉ. संदीप माहिंद ,ॲड.मारुती गोळे