एकलहरे : नवीेन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभरानंतर सोमवारी (दि. १९) रोजी एकलहरे वसाहतीतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कधी एकदाची शाळा सुरूरु होते, याची ओढ लागलेले विद्यार्थी, शाळा सुरू होण्याची सूचना मिळताच मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रांगणात पालकांसह हजर झाले. शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात संस्थेचे संचालक सुरेश घुगे, प्राचार्य प्रदीप सांगळे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच मोहिनी जाधव, राजाराम धनवटे, लकी ढोकणे, सागर जाधव, भास्कर जगताप, आसाराम शिंदे उपस्थित होते.
कोट-
एकलहरे व सामनगाव ग्रामपंचायत यांनी, शाळा सुरू करण्याबाबत, शासन आदेशानुसार ठराव करून दिल्यानंतर, कोविडच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदम गर्दी होऊ नये म्हणून शाळा दोन सत्रात भरविण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची आहे.
- प्रदीप सांगळे - प्राचार्य, एकलहरे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय.
190721\19nsk_42_19072021_13.jpg
फोटो- एकलहरे विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना के.व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुरेश घुगे, प्राचार्य प्रदिप सांगळे, उपप्राचार्य रजनी गिते, सरपंच मोहिनी जाधव, राजाराम धनवटे, सागर जाधव, आसाराम शिंदे, लकी ढोकणे, भास्कर जगताप आदी मान्यवर.