पोलीस कर्मचारी नवनाथ जिभाऊ शेलार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२६) राष्ट्रीय महामार्गावर पोलीस कर्मचारी तेली, पवार, पोलीस नाईक व्हलगडे, जगताप, गोसावी हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दरेगाव शिवारात दुपारी १ वाजेच्या सुमारास स्टार हॉटेलसमोर व रस्त्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टमधील आरोपी हैदर अली आसिफ अली सय्यद (रा. पीर सलीम नगर, चाळीसगाव) हा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटून आल्याने त्याचे समर्थकांनी जंगी स्वागत केले. जमावबंदी असतानाही हैदर अली व त्याचा साथीदार सुफियान (रा. आयेशनगर, मालेगाव व माजीद रा. साठफुटीरोड) यांनी दोन ते तीन वाहनांद्वारे १५ ते २० जणांची गर्दी जमविली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असताना तोंडाला मास्क न लावता गर्दी जमा करून बेकायदेशीररित्या हैदर याच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला. तसेच आरडाओरड करून शांतता भंग केली. सार्वजनिक शांततेचा भंग करून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या असलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तुरुंगातून सुटलेल्या गुंडाचे जंगी स्वागत, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:18 AM