नाशिक : गेल्या सात महिन्यांपासून शालेय पोषण आहार शिजवल्याचे महिला बचतगटांचे मानधन देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल (दि.७) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सीटूप्रणित नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे महिला पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना यासंदर्भात कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोषण आहार शिजविणाऱ्या महिला बचतगटांचे सात महिन्यांचे थकीत बिले त्वरित मिळावेत, बचतगटांकडून कामगारांच्या स्वखर्चाने मागवण्यात येणारा विविध प्रकारच्या खाऊची रक्कम त्यांना अदा करावी, बचतगटांना सवलतीच्या दराने सिलिंडर मिळावीत, अंगणवाडी कामगारांना भांडी घासण्याचे काम करण्याबाबतचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, शालेय पोषण आहार कामगारांचे पगार पंचायत समितीमधून त्यांच्या बॅँक खात्यावर वितरित करण्यात यावेत, कामगारांना प्रत्येक स्तरावर सन्मानाची वागणूक मिळावी, कामगारांना दरवर्षी दोन गणवेश (साड्या) मिळाव्यात यासह निवेदनात एकूण १४ मागण्यांचा समावेश होता. यावेळी आंदोेलनात सीताराम ठोंबरे, कल्पनाताई शिंदे, मीराबाई सोनवणे, साधना झोपे, लता गुंजाळ, माया पगारे, उर्मिला दहिटे, मीना खरे, उषा बळावकर, अलका चव्हाण, मंगला गांगुर्डे, चंद्रभागा गरुड आदिंसह महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
पोषण आहाराच्या थकीत बिलांसाठी महिला बचतगटाचे धरणे
By admin | Published: February 08, 2015 12:38 AM