पाटोदा : राज्यात दुष्काळी तालुका म्हणून असलेल्या येवले तालुक्यातील दुष्काळाचे दृष्टचक्र यंदाही संपलेले नाही. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत असून यंदा भयानक स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वायागेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कुपनलिका कोरड्याठाक पडल्या तर बोअरवेल, हातपंप, कुपनलिकानी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नानेही उग्ररूप धारण केले असल्याने जनावरे जागविण्याकरीता मोठे कष्ट घ्यावे लागतआहेत. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने मजुरांच्या हातांना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासहून अधिक गावे व तीस वाड्या-वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.शासनाने येवला तालुक्यातील काही गावे ही दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरु न केल्यामुळे या भागातील मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात जात असल्याने गावे ओस पडू लागले आहेत. मजुरांचे हे स्थलांतर रोखण्यासाठी या मजुरांच्या हातांना गावातच रोजगार व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दयावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली .कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिण्याच्या पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न गंभीर असतानाच शेतकरी पशुपालकांकडे असलेल्या दुभत्या व शेतीउपयोगी जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. आजमितीस जनावरांना हिरवा चारा सोडा साध्या काड्या, पाला पाचोळा व ऊसाच्या पाचटावर गुजराण करावी लागत आहे. परिणामी इतर तालुक्यात उपलब्ध असलेला ऊस व हिरवा चाºयाचे भावही वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनाने या भागात चारा छावण्या सुरु कराव्या अथवा चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.