ममदापूर : येथे दुष्काळाची तीव्रता वाढली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपदेखील नादुरुस्त झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी परिसरातील महिलांनी ममदापूर ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात केली आहे.ममदापूर येथे पिण्याच्या पाणी योजनेंतर्गत तीन विहिरी व चाळीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे; परंतु दोन वर्षे झाली पाऊस कमी झाल्यामुळे सर्व विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंपावर सर्व गावांची पिण्याच्या पाण्याची मदार असून, हातपंप पाच ते सहा दिवसांपासून बंद पडला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला तत्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे निवेदन दिले अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गणेश गायकवाड, विजय वैद्य, अरुणा जाधव, परिघाबाई उगले, गिरजाबाई थोरात, अरुणाबाई पगार, रामकृष्ण देवरे, विठ्ठल शिंदे आदि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
ममदापूर परिसरातील विहिरी कोरड्या
By admin | Published: February 10, 2016 10:51 PM