मनमाड : पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदूषण प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील, समन्वयक ए. जी. कुडे हे उपस्थित होते. विहिरीच्या पाण्याला इंधनाचा वास येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.येथील प्रकल्पात इथेनॉलसाठी दोन भूमिगत टाक्या तसेच एक एमएसजी टाकी अशा एकूण तीन टाक्यांचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावित टाक्यांमुळे प्रकल्पातील सध्याची इंधनाची साठवण क्षमता २००७० किलोलिटरवरून वाढून २२९३० किलोलिटर होणार आहे. या कामामुळे निसर्ग व पर्यावरणाची काही हानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिपत्याखाली प्रकल्पात पर्यावरण विषयक लोकसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. चैतन्य साठे यांनी परिसरातील जमीन, माती, पाणी, हवा, पशू, पक्षी आदि पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास करून तयार केलेले प्रास्ताविक सादर केले. सर्व मूल्यांकन केल्यानंतर या उपक्रमामुळे पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नसल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी विविध सूचना यावेळी मांडल्या. माजी आमदार संजय पवार यांनी परिसरातील विहिरींच्या पाण्याला इंधनाचा वास येत असल्याचा तसेच कंपनी परिसरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. साधना गायकवाड, विक्रम चव्हाण, दत्तू सोनवणे, अंकुश कातकाडे, संजय निकम, दत्तू शिंदे, शिवाजी ढगे आदि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सूचना मांडल्या. प्रकल्प व्यवस्थापक नितीन जोशी यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी कंपनीला दिल्या. (वार्ताहर)
विहिरींच्या पाण्याला इंधनाचा वास
By admin | Published: February 08, 2017 11:59 PM