नाशिक : कानबाई मातेच्या उत्सवासाठी मुळ गावी सहकुंटुंबासह गेलेल्या एका लघुउद्योजकाचे कुलुपबंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी जबरी लूट केल्याची घटना मंगळवारी (दि.२२) उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे सुमारे बारा ते पंधरा तोळ्यांच्या दागिन्यांसह ४० हजारांची रोकड असा सुमारे ४ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डीफाटा येथील वासननगर भागात पोलिस वसाहतीसमोर कमलज्योत रो-हाऊस आहे. याठिकाणी तीसऱ्या क्रमांकच्या रो-हाउसमध्ये राहणारे फिर्यादी मनोजकुमार आनंदा नेरकर (३८) हे त्यांच्या पत्नी मुलांसह रविवारी (दि.२०) धार्मिक उत्सवासाठी मुळ गावी गेले होते. यावेळी त्यांनी घराचा दरवाजा कुलुपबंद केला होता. जेव्हा ते दोन दिवसांनी घरी परतले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचे कुलुप लावलेले दिसले नाही. तेव्हा नेरकर यांनी तातडीने दरवाजा उघडून घरात जाऊन बघितले असता वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाट उघडलेले व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तसेच कपाटाती सर्व दागिने, रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
यावेळी साडेचार तोळ्याची सोन्याची पट्टी माळ, साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा राणी हार, दीड तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, सात ग्रॅमचे कर्णफुले, दीड तोळ्यांची सोन्याची चैन, वेढे, नाणी, चार ग्रॅमच्या बाळांच्या पाच अंगठ्या, चांदीचे जोडवे असा एकूण चार लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नेरकर यांचा अंबड एमआयडीसीमध्ये स्वत:चे वर्कशॉप आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अज्ञात चोरांविरूद्ध दाखल केला आहे.