संजय पाठक, नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केला किंवा व्यवहारीकाता न पडताळता निर्णय घेतला की, त्याचे कटू परिणाम समोर येतात. नाशिक महापािलकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित बैठकीत नियमांच्या अतिरेकावरून कार्यकर्त्यांनी जो क्षोभ व्यक्त केला, तो याच सदरातील आहे.दरवर्षी गणेशोत्सव आला की महापालिका त्यावर चर्चा करते, त्याचवेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन उत्सव कसा शांततेत पार पाडता येईल यावर चर्चा करत असते. या बैठका अत्यंत औपचारीक ठरतात. विशेषत: दरवर्षी मिरवणूक मार्गावरील खडडे बुजवावे, लटकत्या तारा भूमिगत कराव्यात, मिरवणूका दुपारी सुरू कराव्यात, निर्माल्य कलश असावेत अशाप्रकारच्या नियमीत विषय आणि फार तर गणेश मंडळांना प्रयोजक असेल तर त्यांच्या जाहिरातींवरील कर माफ करावे यापलिकडे अशा बैठकांमधून फार काही पार पडत नाही. मात्र अलिकडच्या काळात नियमांचा जाच वाढु लागल्याने मंडळांवरील ताण देखील वाढु लागला आहे. गणेश मंडळांसाठी नियमावली आली, रात्री दहा वाजेनंतर ध्वनीक्षेपक वाजवायचा नाही. मिरवणूक रात्री बाराच्या आत संपली पाहिजे, डीजे वापरायचा नाही. आणि आता तर मंडपाच्या आकारावर देखील निर्बंध आहेत. (हे धोरण मनपाने ठरवले आहे, उच्च न्यायालयाने केवळ धोरण ठरवा असेच आदेश दिले आहेत.) नागरीकांना त्रास होऊ नये यासाठी ही निमयावली असली आणि त्याचे पालन झालेही पाहिजे हे खरे असले तरी व्यावहारीक पातळीवर त्याचा विचार झाला पाहिजे.रात्री दहा वाजेनंतर ध्वनीक्षेपक वाजवू नये ठिक परंतु केवळ देखावे बंद करण्यास भाग पाडणे कितपत संयुक्तीक आहे. शहरातील चाकरमाने असो अथवा गावठाणातील नागरीक असो. दिवसभराच्या कामकाजानंतर घरी येऊन मग सहकुटूंब शहरातील देखावे बघण्यासाठी बाहेर पडतात. बहुतांशी मंडळाची विद्युत रोषणाई आणि चमक दमक रात्र पडल्यानंतरच दिसते. परंतु अशावेळी ज्या प्रमाणे शहरातील दुकाने रात्री दहा वाजता दुकाने बंद केली जातात त्याच धर्तीवर देखावे देखील बंद करण्यात काय हशील? शहरातील काही उत्सवांची तर वेगळी परंपराच असते. नवरात्र म्हणजेच रात्री उशिरापर्यंत चालणारा उत्सव नाशिकच्या ग्रामदेवता कालीका देवीच्या दर्शनासाठी नागरीक अहोरात्र दर्शनास येतात. काही जण पहाटे चार वाजेच्या काकड आरतीला देखील येतात. परंतु तेथेही मदिर बंद करण्यास भाग पाडण्यात येते. वाहतूकीला अडथळा होतो म्हणून या भागातील दुकाने बंद करून अवघी यात्राच आता संपुष्टात आली आहे आता गणेश उत्सव देखील असाच संपवायचा काय?मंडपाचे नियम असावेत, नागरीकांना जाण्या येण्यासाठी मार्ग असावेत इतपर्यंत ठिक परंतु केवळ एक रस्ता बंद झाला तर नाशिक मध्ये शहराला पाच ते सात किलोमीटर वळसा घालून जावा लागेल अशी स्थिती कोठेही नाही. गावठाण भागातच तर चार ते पाच मीटर रंदीचे रस्ते आहेत तेथे मंडपाच आकार कमी करून करून किती कमी करणार? म्हणजे गावठाणातील उत्सवच बंद करणार काय? जी महापालिका स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ दरम्यानचा अवघा एक किलो मीटरचा रस्ता दीड ते दोन वर्षात पुर्ण करू शकली नाही आणि त्यामुळे नागरीकांना दीड दोन वर्षांपासून अनेक मार्ग बदलून फिरावे लागत आहेत. तेथे दहा दिवस एक गल्ली बंद ठेवल्याने नागरीकांचे हाल होतात असा म्हणण्याचा कोणता नैतिक अधिकार महापालिकेला शिल्लक राहतो?जाहिरात कराचा मुद्दा असाच आहे. शहरात शेकडो जाहिरातीचे पोस्टर बॅनर महापालिकेच्या भींती, दुभाजक, वाहतूक बेट इतकेच नव्हे तर झाडांवर खिळे ठोकून लावले जातात. त्यांच्याकडून महापालिका किती कर वसुल करते हा देखील प्रश्न आहे.(या विषयावरून नुुकत्याच एका उपाआयुक्तावर करवाई करावी लागली आहे.) या सर्वाचा विचार करता नाशिकमध्ये उत्सव अनिर्बंध किंवा बेकयदेशीर व्हावा असे नाही परंतु नियम लावताना व्यावहारीकता तपासली पाहीजे. उत्सवच बंद पडु लागला तर सार्वजनिक जीवनाला अर्थ उरत नाही. शेवटी असे उत्सव सुरू कररण्यामागे समाज धुरीणांचे काही उद्दीष्ट आहेत हे विचारात घेतले पाहिजे. समाजाजिक जिवनातून काही वादच निर्माण होतात असे नाही आणि वाद होतात म्हणून समाजाने एकत्रच यायचे नाही असेही नाही. त्यामुळे उत्सव निर्बंध नसले तरी ते उत्सवच संपुष्टात आणू शकतील इतकेही कठोर नको. मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये कायद्याचे पालन खूप चांगले होते. परंतु तेथे वास्तविकदा लक्षात घेऊन जर नियम शिथील होत असतील तर ते नाशिकमध्ये देखील व्हायला हवेत. कारण उच्च न्यायलयाचे आदेश किंवा शासनाचे धोरण मुंंबई पुण्यासाठी वेगळे आणि नाशिकसाठी वेगळे असे नसते. मग, नाशिकमध्ये नियमांची करचकून अंमलबाजावणी कशी काय चालेल!शेवटी गणेश मंडळे ही सामजिक जाणिवेतून निर्माण झाली आहे. ते चालवणारे (सर्वच) गुन्हेगार नव्हेत. कायद्याचा भंग केला तर संबंधीतांवर कारवाई व्हावी, ती यापूर्वी देखील झाली आहेच.परंतु सर्वच जण तसे नाही अनेक जण हौस मौज म्हणून एकत्र येतात परंतु अनेक मंडळे तर वर्षभर चांगल्या प्रकाराचे सामाजिक काम देखील करतात. रविवार कारंजा मित्र मंडळ, वेलकम मित्र मंडळ असे अनेक मंडळे आहेत. त्यामुळे आजवर महापालिकेच्या बैठका उपचार ठरत असताना प्रथमच कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मंडळांइतकीच कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी यंत्रणांनी देखील घेतली पाहिजे.