नाशिक : नवीन शैक्षणिक वर्षात नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाविषयी काय धोरण राबवावे, याविषयी शिक्षण विभागाने कोणत्याही स्पष्ट सूचना केेलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातील पहिलीसह विविध वर्गांमध्ये दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार? त्याचप्रमाणे चौथीचे वर्ग पाचवीला जोडण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप त्याविषयी स्पष्ट सूचना नसल्याने पाचवीचा वर्ग नसलेल्या शाळांनी चौथीतून वर्गोन्नत विद्यार्थ्यांचे काय करायचे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनासह मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण विभागाने पहिली ते अकरावीच्या सर्वच परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार, याविषयी शिक्षण विभागाने कोणत्याही स्पष्ट सूचना केलेल्या नाहीत. कोरोनामुळे एकीकडे पहिलीची प्रवेश प्रक्रिया स्थगित केलेली असताना दुसरीकडे खासगी शाळांनी पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्रवेश सुरू केले आहेत. शासनाच्या जिल्हा परिषद शाळांमध्येही प्रवेश सुरू झाल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या स्पष्ट सूचना नसल्याने खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि काही शासकीय शाळांच्या मुख्याध्यापकांसमोरही नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोट-
नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप शाळा मुख्याध्यापकांना मिळालेल्या नाहीत. काही शाळांनी १ मे रोजी निकाल जाहीर केले असले तरी पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशांचे काय, याविषयी संभ्रमावस्था आहे. त्याचप्रमाणे चौथीचे वर्ग पाचवीला जोडण्याचा निर्णय झाला होता. त्याविषयी अद्याप स्पष्ट सूचना प्राप्त नाही. त्यामुळे पाचवीचा वर्ग नसलेल्या शाळांनी चौथीतून वर्गोन्नत विद्यार्थ्यांचे काय करायचे, याविषयी स्पष्ट सूचना मिळणे अपेक्षित आहे.
- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी विद्यालय
कोट-
कोविड काळात शाळांमध्ये १५ टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असून, त्यांनी गेल्यावर्षाप्रमाणेच प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्याचप्रमाणे खासगी शाळांनीही प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे यावर्षी नवीन प्रवेशाविषयी स्वतंत्र अशा वेगळ्या कोणत्याही सूचना नाहीत.
- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारीे