श्याम बागुलखुर्ची मग ती कोणतीही असो, ती मिळविण्यासाठी व मिळाल्यावर टिकवून ठेवण्यासाठी नानाविध प्रयत्न करावे लागतात. मग ती खुर्ची शासकीय असो वा राजकीय, सत्तेची असो वा संघटनेची. मुळात खुर्चीबरोबर त्या खुर्चीला चिकटून आलेली कर्तव्ये व जबाबदारीचे पालन करणेही ओघाने खुर्चीधारण करणाऱ्यावर आपसूकच येते. शासकीय खुर्ची एका जागेवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ उबवता येत नाही, मात्र तीच खुर्ची जर राजकीय व सत्तेची असेल तर ती सोडवतही नाही. परंतु सिन्नर तालुक्यात ‘खुर्ची’ गाजत आहे ती वेगळ्याच कारणाने. वरकरणी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या खुर्चीची खरेदी झाली असेल व जनहितासाठी तिचे वाटप केले असले तरी, या ‘खुर्ची’च्या निमित्ताने तालुक्याचे राजकारण विधानसभेच्या तोंडावर गरमा-गरम उबदार झाले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जिल्हा परिषद सेस फंडातून मिळालेल्या निधीतून २३६ खुर्च्यांची खरेदी केली व त्याचे वाटप तालुक्यातील सलून दुकानदारांना केले. सांगळे यांच्या मते राज्यात अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग राबविणारी नाशिक जिल्हा परिषद पहिलीच असून, ख-या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचला आहे. सांगळे यांच्या ‘खुर्ची’ वाटपाला जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांची हरकत नाही. मात्र या खुर्च्यांच्या खरेदीसाठी मोजलेले द्रव्य तिचा दर्जा व गुणवत्तेपेक्षा अधिक असण्याला कोकाटे यांचा आक्षेप आहे व त्यांनी जिल्हा परिषदेच्या भर सभेत तो बोलूनही दाखविला. त्यातून सांगळे व कोकाटे यांच्यात झालेली तणातणी अवघ्या सभागृहाने अनुभवली. सांगळे शिवसेनेच्या व कोकाटे भाजपाच्या असल्याने सभेतील ‘खुर्ची’ वादाकडे मैत्रिपूर्ण लढत म्हणूनही कोणी पाहिले असले तरी, सिन्नर तालुक्यातील आगामी राजकीय सत्तासोपानाची खुर्चीवर डोळा ठेवून खेळलेली ती खेळी आहे हे लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी करून आपली राजकीय ताकद अजमाविण्याचा प्रयोग केला. त्यात ते अपयशी ठरले. मात्र त्यानिमित्ताने त्यांचा भारतीय जनता पक्षाशी झालेला द्रोह तसाच कायम राहिला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शीतल सांगळे व पर्यायाने सांगळे कुटुंबीयांनी आपली सारी रसद कोकाटे यांच्या विरोधातील सेना उमेदवार हेमंत गोडसे यांना पुरविली. त्यामागचे कारणही स्पष्ट आहे. सेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक असलेल्या सांगळे कुटुंबीयांना जिल्हा परिषदेच्या सत्तासोपानाची ‘खुर्ची’ वाजे यांच्या कृपादृष्टीने मिळाली असून, वाजे हे आगामी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. लोकसभेला पराभव झाला असला तरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघातून मिळालेले मताधिक्क्य पाहता माणिकराव कोकाटे हेदेखील विधानसभेचे उमेदवारी करण्यास उत्सुक आहेत. सिन्नर मतदारसंघात वाजे व कोकाटे यांच्यात लढत अटळ असली तरी, कोकाटे हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व व पर्यायाने आपली ‘खुर्ची’ टिकवून ठेवण्यास यशस्वी झालेल्या कोकाटे यांची ‘खुर्ची’ गेल्या विधानसभा निवडणुकीत वाजे यांनी हिसकावून घेतली होती. त्याच वाजे यांचे समर्थक सांगळे कुटुंबीय अग्रेसर होते. आता पुन्हा एकदा वाजे व कोकाटेत आमना-सामना होणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सांगळे यांना ‘खुर्ची’ खरेदीच्या निमित्ताने सीमंतिनी कोकाटे यांनी घेरणे साहजिकच म्हणावे लागेल. सिन्नरच्या आगामी राजकारणातील सत्तासोपानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेची ‘खुर्ची’निमित्त ठरली आहे.