नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय रुग्णालयापाठोपाठ नाशिक महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे असे ऑडिटच झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
कोणत्याही इमारतीत ज्याप्रमाणे अग्निशमन प्रतिबंधक साधने आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फिटिंग्जही आवश्यक आहे. त्यानुसार, ठरावीक कालावधीनंतर इलेक्ट्रिक साधने तपासणी करणे आवश्यक आहे, परंतु नाशिक महापालिकाही पालक संस्था असताना, त्यांच्या गावीही हा विषय नाही. महापालिकेची बिटको आणि न्यू बिटको, त्याचबरोबर, जिल्हा पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय आणि कथडा येथील डॉ.झाकीर हुसेन रुग्णालये हे चार प्रमुख रुग्णालये आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्याच वर्षी शासनाच्या बांधकाम विभागाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी कळवले होते. मात्र, बांधकाम विभागाने अद्याप ते केलेले नाही. नाशिक महापालिकेत मात्र वेगळी बाब आहे. या यंत्रणेचा स्वत:चा विद्युत विभाग आहे, परंतु तरीही अशाप्रकारचे इलेक्ट्रिक ऑडिट करावे लागते, याचा विचारही झालेला नाही.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गेल्याच वर्षी फायर ऑडिट करून घेतले आहेत. मात्र, इलेक्ट्रिक ऑडिटच केलेले नाही. विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले व अशा प्रकारचे ऑडिटबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे खासगी रुग्णालयांची फायर ऑडिटवरून अडवणूक करणारी महापालिका प्रत्यक्षात आपल्या रुग्णालयांच्या बाबतीत किती सजग आहे, हेच स्पष्ट झाले आहे.
कोट...
गेल्याच वर्षअखेरीस महापालिकेने आपल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट केले होते. मात्र, इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. या संदर्भात मनपाच्या विद्युत विभागाला पत्र देऊन ऑडिट करून घेतले जाईल.
- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका