सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंचे नेमकं ‘ठरलयं’ काय?
By श्याम बागुल | Published: August 2, 2019 01:41 PM2019-08-02T13:41:42+5:302019-08-02T14:03:14+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेची युती होणार नसल्याचे जे काही वातावरण तयार झाले होते, ते पाहता राजकीय सोयीने भाजपावासिय झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी सुरू केली होती
श्याम बागुल
नाशिक : गोष्ट फार जुनी नाही, पाच वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार होत असतानाच सिन्नरच्या मैदानातून ‘मी म्हणजेच पक्ष आणि मी म्हणजेच सरकार’ असे जाहीरपणे सांगणारे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची गेल्या पाच वर्षातील राजकीय कारकिर्द आज वेगळ्याच वळणावर येवून उभी राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करण्याचे त्यांचे धाडस फारसे कामी आले नसले तरी, त्यानिमित्ताने त्यांनी अजमाविलेली राजकीय ताकदही आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्लक्षून चालणार नाही. कोकाटे यांनी विधानसभा निवडणूक लढविणारच असा जो काही ठाम निश्चय त्यांनी केला ते पाहता त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीची दिशा समजत असली तरी, त्यांचे नेमकं ‘ठरलयं’ काय याचा उलगडा मात्र होत नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेची युती होणार नसल्याचे जे काही वातावरण तयार झाले होते, ते पाहता राजकीय सोयीने भाजपावासिय झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दिसत असलेले वातावरण पाहून अखेरच्या क्षणी भाजप-सेनेची युती झाल्याने कोकाटे यांचा भ्रमनिरास होणे साहजिकच होते. त्यांनी भाजपाकडून उमेदवारी करून मैत्रिपुर्ण लढतीचा प्रस्ताव भाजपाकडे दिला, जो मान्य होण्यासारखाच नव्हताच. त्यामुळे कोकाटे यांना बंडखोरी करावी लागली व त्यांनी अपक्ष उमेदवारी करून आपली राजकीय ताकद अजमाविली. अर्थातच लोकसभा मतदार संघाचा विस्तार पाहता व कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारी शिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धाडसाचे होतेच, ते कोकाटे यांनी केले असले तरी, त्यात त्यांना सिन्नर या आपल्या जन्मभुमीत राजकीय ताकद अजमावून पाहिली. एकट्या सिन्नर विधानसभा मतदार संघात कोकाटेंना जे काही मताधिक्क्य मिळाले ते पाहून अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देणारेच आहे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पुन्हा एकदा कोकाटे यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. युतीचे नेते जाहीरपणे एकत्र लढण्याची भाषा करीत असल्यामुळे सिन्नर मतदार संघ सेनेला सुटेल याविषयी कोणाचे दुमत नसेल. फक्त कोकाटे कोणत्या पक्षाकडून लढणार की पुन्हा अपक्ष उमेदवारी करणार असा प्रश्न आहे. कॉँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांच्या मदतीने आघाडीची घोषणा केलेली आहे. जागा वाटपाचा विचार करता, सिन्नरची जागा कॉँग्रेसला सुटणार असली तरी, आजच्या घडीला दोन्ही कॉँग्रेसकडे सक्षम उमेवाराचा शोध सुरू आहे. निवडून येण्याची क्षमता राखणाऱ्यांनाच पक्षाची उमेदवारी अशी भूमिका आघाडीने यापुर्वीच घेतली असल्याने कोकाटेंशिवाय दुसरा सक्षम उमेदवार त्यांच्या डोळ्यासमोर नसणार हे जरी खरे असले तरी, कोकाटेंचा त्याला किती प्रतिसाद देतील याविषयी तर्क विर्तक लढविले जात आहेत. दोन दिवसांपुर्वी कॉँग्रेसच्यावतीने विधानसभेच्या इच्छुकांच्या मुलाखतीचा सोपस्कार पार पडला, त्यात कोकाटे नव्हते परंतु कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे ‘ठरलयं’अशी जी काही चर्चा कॉँग्रेसभवनात रंगली त्यावरून तरी, कोकाटे आपले राजकीय वर्तुळ पुर्ण करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहेत असे मानण्यास हरकत नसावी. मात्र नुसतीच कॉँग्रेसची उमेदवारी घेवून सद्य स्थितीत निवडणूक जिंकता येणार नाही, हे सिन्नरच्या मातीत खेळलेल्या कोकाटे यांना चांगलेच ठावूक असल्याने राष्टÑवादीशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायही नाही. त्याचमुळे ‘कॉँग्रेसची उमेदवारी घेतो, पण राष्ट्रवादी व छगन भुजबळ यांचे तेव्हढे बघा’अशी जी काही अट कोकाटे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर ठेवल्याची चर्चा होत आहे त्याची सत्यता पडताळून घ्यावी लागेल. गेल्या निवडणुकीत भुजबळ यांनी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्यापाठीशी छुपी ताकद उभी करून आपला पराभव केला हे कथित शल्य कोकाटे यांच्या मनात अजुनही कायम असले तरी, गेल्या पाच वर्षातील राजकीय विजनवासाचा अनुभव स्वत: कोकाटे व भुजबळ दोघेही घेत आहेत. त्यामुळे कोकाटे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात जे काही ‘ठरलयं’ असे म्हणतात त्याचा खुलासा दोघांनीही केलेला बरा !