Nashik Raj Thackeray ( Marathi News ) :राज ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा आज नाशिक शहरात पार पडला. या सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीसह विरोधकांच्या महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच मनसेकडून आंदोलने अर्धवट सोडली जातात, या विरोधकांच्या आक्षेपालाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचीही आठवण करून दिली आहे.
मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मनसेनं अनेक कामे केली, आंदोलने केली, यशस्वी आंदोलन केली. अनेकांनी तुरुंगवास भोगला. लाठ्याकाठ्या खाल्ल्या ते महाराष्ट्रासाठी...मग आपले विरोधक काही गोष्टी पसरवतात. एक आंदोलन दाखवायचे ज्याचा आम्ही शेवट केला नाही. बाकीच्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. मग आम्ही विचारतो, अरबी समुद्रात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झाले नाही?" असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
पक्षाच्या कामाविषयी पुढे बोलताना राज यांनी म्हटलं की, "मनसेने जी आंदोलने केली त्याचा शेवट झाला, फोनवर मराठी ऐकायला यायला लागले, ६५ टोलनाके बंद झाले. मराठी पाट्या झाल्या. अनेक प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद झाले. उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले. हे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात. या मुलांनी काय चुकीचे केले होते? ज्या भोंग्याचा मुस्लीम समाजालाही त्रास होतो, अनेक मुस्लीम बांधवांनी मला सांगितले की. लहान मुले आहेत त्यांना भोंग्याचा त्रास होत होता. सरकार ढिले पडल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले. हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एकसाथच बंद करून टाकतो. त्यानंतर भोंगा लावण्याची कुणाची हिंमत आहे बघू...समुद्रावरती अनधिकृत मशिद बांधली जात होती एका रात्रीत पाडायला लावली. आम्ही प्रार्थना, नमाज करू नका म्हणतोय का? बाकीचे लोक आपल्याबद्दल जो अप्रचार करतायेत त्याबद्दल त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. पहिल्यापासून आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती आणि आहे. रस्ते नीट नाहीत आणि टोल वसूल केले जातात," असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, "आपण जेवढी आंदोलने केली इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी केली नाहीत. हे लोकांपर्यंत पोहचतंय. मला अनेक माताभगिनी भेटतात आणि आता फक्त विश्वास तुझ्यावर आहे असं सांगतात. हा आज लोकांचा विश्वास टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. बाकींच्या लोकांचा विश्वास गमावला आहे. राष्ट्रवादी आजही एकच आहेत असं माझं ठाम मत आहे," असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.