(साराश)भारतीय जनता पार्टीला विविध पातळीवर घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जात आहेत. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने झालेली निषेध आंदोलनेही दखलपात्र ठरावीत अशी होती. त्यातुलनेत सत्ताधारी पक्षाकडून केला गेलेला समर्थनाचा जल्लोष खूपच जुजबी होता. अशात, पक्षाच्या नाशकातील नेत्यांमधील वादापाठोपाठ मालेगावात चक्क हाणामारीच घडून आल्याने व त्या संबंधाने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीकडे फोन केला गेल्याने ‘कुठे नेऊन ठेवला आहे इतरांपेक्षा वेगळेपणाची भाषा करणारा भाजपा’, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.सत्ता साध्य करण्यासाठी तत्त्व, निष्ठांशी तडजोड करणाºया व पक्ष विस्ताराच्या नावाने मोठ्या प्रमाणात नवागंतुकांना पक्षात प्रवेश देत स्वकीयांना मात्र संधीसाठी तिष्ठत ठेवणा-या भाजपात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीवर डोळे वटारण्याबरोबरच पक्षाचे पदाधिकारी व नेत्यांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडून येऊ लागल्याने हेच का या पक्षाचे अन्य पक्षांपेक्षाचे वेगळेपण, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींकडून सध्या जनजागरण सुरू आहे. तात्पुरत्या मलमपट्टीचा विचार न करता शाश्वत विकासाच्या दृष्टीने सरकारकडून अनेकविध निर्णय घेतले जात आहेत व योजनाही आखल्या जात आहेत. राज्यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी पुढाकार घेत असून, धडाकेबाजपणे निर्णय राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा विषय असो, की समृद्धी द्रुतगती मार्ग बाधितांचा; फडणवीस यांनी स्वत: त्यात लक्ष घालून समाधानकारक ठरतील असे निर्णय घेतले. राज्यातील जनतेनेही भाजपावर काहीसा विश्वास व्यक्त करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीपेक्षा जास्तीचेच मतांचे दान दिले. पण असे सारे असताना, आणि हळुहळु विरोधीपक्ष या ना त्या माध्यमातून सरकारचे अपयश वा उणिवा लोकांसमोर मांडण्यात आक्रमक होत असताना खुद्द भाजपातील ‘अच्छे दिन’चे वातावरण टिकून राहू शकलेले दिसत नाही. या पक्षाच्या नेत्यांतील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले असून, त्यातून पक्षालाच बदनामीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. अर्थात, पक्षांतर्गत मतभेद कुठे नाहीत, वा कोण त्याला अपवाद आहे? विशेषत: सत्ता ज्या पक्षाकडे असते, तिथे तर सारेच जण संधीच्या शोधात अगर प्रतीक्षेत असतात. त्यामुळे जरा कुणाच्या मनाविरुद्ध घडले की, ठिणगी पडल्याखेरीज राहात नाही. भाजपातही असे सत्ता असून सत्तेचा लाभ न मिळालेले अनेक आहेत. पण त्यातील जे निष्ठावान गटातील आहेत, ते आपली नाराजी जाहीरपणे न मांडता संयम बाळगून आहेत; मात्र केवळ सत्तेच्याच अनुषंगाने पक्ष बदल करून आलेले यासंबंधातील आपली खंत लपवू शकलेले नाहीत. पक्षाच्या आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे चिंतनाच्या भानगडीत न पडता, पक्षाने चिंता करावी असे मग या नाराजांकडून घडून येते. त्यामुळेच ‘पार्टी विथ डिफरन्स’चा जयघोष करणाºया भाजपासारख्या पक्षाची अडचण होऊन बसते. महत्त्वाचे म्हणजे, सामान्य पक्ष कार्यकर्त्यांनी याबाबत राजी-नाराजी व्यक्त करणेही एकवेळ समजून घेता यावे. परंतु नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्यांच्याकडूनच जेव्हा काही आगळिकीचे प्रकार घडून येतात तेव्हा राजकारणातील वेगळेपणाची कल्हई उडून गेल्याशिवाय राहात नाही. अशा प्रकारच्या घटनांना नाशिक जिल्हाही अपवाद ठरू शकलेला नाही. नाशकातील स्त्री रुग्णालयाच्या जागेच्या प्रश्नावरून पक्षाच्या विद्यमान आमदार व पक्षात आलेले माजी आमदार यांच्यात जे द्वंद घडून येत आहे ते पुरेसे नाही म्हणून की काय, आता मालेगावमध्ये पक्षाचे नेते व स्वत: महानगरप्रमुखांतील वितुष्ठ रस्त्यावर आलेले पहावयास मिळाले. नाशकातील रुग्णालयाच्या प्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निर्णयालाही न जुमानण्याचे धाडस दाखविले गेले, आणि तेवढ्यावरच न थांबता ‘आरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर देण्यासारखी भाषाही घडून आली. तिकडे मालेगावी तर चक्क हाणामारीच झाली. हे भाजपातील संस्कार खचितच नाहीत. सत्ता तर आता आली आहे. पण यापूर्वी जेव्हा सत्ता नव्हती व पर्यायाने संधी कमी होती तेव्हा अनेकांना घरी बसून राहावे लागत होते. त्यांच्या मनासारखे घडत नव्हते. परंतु म्हणून कुणी पक्षाची अडचण होईल असे वागताना फारसे दिसत नसे. पक्षातील नेतृत्वकर्त्या मंडळीचा धाकही होता तसा. नेत्यांनी समजावल्यावर किंवा दटावल्यावर त्यांच्यापुढे जाण्याची कुणाची हिंमत नसे. आज भाजपातील चित्र बदलले आहे. स्थानिक पातळीवरच काय, राज्यस्तरावरही काही निर्णय घेतला गेला तर तो अमलात आणण्याचे बंधन कुणी बाळगून घेत नाही. कुणी कुणाचे ऐकायला, की कुणाला जुमानायला तयार नाही. त्यातून हाणामारीपर्यंत मजल मारली गेली आहे. विशेष म्हणजे, मालेगावी ज्या दोघांत सदर प्रकार घडून आला ते दोघेही अन्य पक्षांतून भाजपात आलेले. तेथील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी व ‘शत-प्रतिशत’च्या नादात त्यांना घेतले गेले असले तरी, प्रारंभापासूनच त्यांच्यात बेबनाव राहिल्याचे वेळोवेळी दिसून आले. खरे तर मालेगावमधील पक्षाची नाजूक अवस्था अलीकडच्या काळात बदलली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाच्या चांगल्या जागा आल्या आहेत. स्थानिक बाजार समितीतही शिवसेनेला दणका देत या पक्षाचे अस्तित्व निर्माण झाले आहे. शेतकी संघ ताब्यात आला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भलेही यश मिळाले नाही, पण पक्ष घराघरांपर्यंत पोहचविता आला. अशा स्थितीत स्थानिक पातळीवरील प्रस्थापित अन्य पक्षीय नेतृत्वाच्या विरोधाचा लाभ उचलण्याचे सोडून हाणामारी घडून आल्याने पक्षाच्या नावाला गालबोट लागून गेले. बरे, असा हा धसमुसळेपणा पहिल्यांदाच घडला असे नाही. मागे पालकमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनाच धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकारही घडून आला होता. परंतु तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. या अशा घटना बºयाचदा व्यक्तिगत हेवेदावे अगर नेतृत्वाच्या स्पर्धेतून घडत असल्या तरी, त्याबाबत वेळीच कानटोचणी होणे गरजेचे असते. सत्तेच्या पदांवर असो - नसो; पण सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडे विरोधकांसह जनतेचे लक्ष लागून असते. म्हणूनच त्यांचे वर्तन जबाबदारीपूर्ण असावे लागते. नाशिक व मालेगावमधील दोन्ही प्रकरणात तसे ते दिसले नाही. यातही नामुष्कीची बाब म्हणजे, मालेगावात शिवसेनेशी स्पर्धा करीत ज्या व्यक्तीविशेषाविरोधात राजकारण केले जात आहे त्याच व्यक्तीकडे तक्रार करण्याची वेळ भाजपा नेत्यावर ओढवली. भाजपाचा देशभरात कितीही गाजावाजा असला तरी मालेगावात शिवसेनेलाच ‘अच्छे दिन’ असल्याचा संकेत देणारीच ही बाब म्हणता यावी. महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी भाजपाला तिकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळालेला दिसत नाही. नोटाबंदीच्या विरोधात सर्वत्र आक्रोश व निषेध आंदोलने होत असताना सत्ताधारी पक्षातर्फे जो समर्थनाचा जल्लोष व्हावयास हवा होता, तोही तसा होऊ शकला नाही. याउलट मालेगावातील हाणामारीचा प्रकार पुढे आला. त्यामुळेच भाजपात ‘हे’ काय चाललेय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजपात ‘हे’ चाललेय काय?
By किरण अग्रवाल | Published: November 12, 2017 1:53 AM
भारतीय जनता पार्टीला विविध पातळीवर घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जात आहेत. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने झालेली निषेध आंदोलनेही दखलपात्र ठरावीत अशी होती. त्यातुलनेत सत्ताधारी पक्षाकडून केला गेलेला समर्थनाचा जल्लोष खूपच जुजबी होता.
ठळक मुद्देपक्षाचे पदाधिकारी व नेत्यांमध्ये हाणामारीचे प्रकार‘अच्छे दिन’चे वातावरण टिकून राहू शकलेले नाहीनोटाबंदीच्या विरोधात सर्वत्र आक्रोश व निषेध