भाजपने जे पेरले, तेच तर आज उगवले आहे!

By किरण अग्रवाल | Published: June 30, 2019 01:01 AM2019-06-30T01:01:42+5:302019-06-30T01:15:08+5:30

नाशिक महापालिकेतील सभागृह नेत्यानेच सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणून ठेवल्याने अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. परंतु तेवढ्याने भागेल का? कारण नाशकात भाजपमध्ये ओढवलेल्या निर्नायकी अवस्थेमुळेच हा पक्ष अडकित्त्यात अडकला आहे. तेव्हा केवळ फांद्या छाटून फारसा उपयोग होण्याची अपेक्षाच करता येऊ नये.

 What has been sown by the BJP, that has arisen today! | भाजपने जे पेरले, तेच तर आज उगवले आहे!

भाजपने जे पेरले, तेच तर आज उगवले आहे!

Next
ठळक मुद्देभाजपचीच लक्तरे वेशीवर टांगली जाणे स्वाभाविक ठरले.मुख्यमंत्र्यांच्या दत्तक पालकत्वावर भरोसा ठेवून भाजपला एकहाती सत्ताएकट्या दिनकर पाटील यांच्यावरील कारवाईने काय साधले जाईल?

सारांश

तत्त्व अगर निष्ठांचे ओझे आता कुणासही बाळगावेसे वाटत नसल्याने तत्कालिक पक्षीय लाभासाठी ‘प्रासंगिक तडजोडी’ स्वीकारल्या जातात; पण पुढे चालून त्याच कशा अंगलट येतात व पक्षालाच तोंड लपवायला भाग पाडणाऱ्या ठरतात हे नाशिक महापालिकेत जे काही पहावयास मिळाले त्यावरून लक्षात यावे. सत्ताधारी पक्षाचा सभागृह नेता विरोधकांच्या साथीने स्वकीयांनाच घेरताना दिसून आल्याने त्याचे पद काढून घेत बलपूर्वक आंदोलन चिरडण्याची वेळ आली व त्यातून भाजपचीच लक्तरे वेशीवर टांगली जाणे स्वाभाविक ठरले.
नाशिक महापालिकेतील सत्तेचा कौल देताना नाशिककरांनी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दत्तक पालकत्वावर भरोसा ठेवून भाजपला एकहाती सत्ता सोपविली; परंतु गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी असा काही कारभार करून दाखविला की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कुठे असा शब्द देण्याचा विचार करू नये. एक तर सत्तेच्या अनुषंगाने पक्षाचा म्हणून प्रभाव निर्मिला जावा, तर तसे काहीच घडले अगर घडविता आले नाही; त्याउलट सततच्या पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे पक्षच वेठीस धरला गेला, आणि दुसरे म्हणजे पक्षाला व्यापक करण्याच्या हेतूने अगर संख्याबळ गाठण्यासाठी घाऊक स्वरूपात परपक्षीयांना कडेवर घेतल्याने पक्षातील निष्ठावंत दुखावले गेले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे जे ६६ नगरसेवक निवडून आले आहेत त्यातील तब्बल पन्नासेक, म्हणजे ८० टक्के उधार-उसनवारीचे; हवेचा अंदाज घेत ‘कमळ’ हाती धरलेले व निवडून आलेले आहेत. यातही विशेष म्हणजे, या अन्य पक्षातून आलेल्यांना महापालिकेतील काही महत्त्वाची पदे दिली गेलीत. त्यामुळे भाजपची तथाकथित शिस्त ठोकरून लावत अशांनी भाजपचीच पंचाईत करून ठेवली. विरोधकांच्या हातात हात घालून सत्ताधारी भाजपच्याच सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सभागृहात जे ठिय्या आंदोलन केले, ते यातलेच.
मुळात, पाटील यांनी पक्षाला अडचणीत आणल्याचा हा पहिलाच प्रकार नव्हता. यापूर्वीही अनेकदा तसे घडले आहे. अर्थात, ते काँग्रेसमध्ये असताना दुसरे काय घडायचे? पण तिथे गटबाजीचा पूर्वानुभव असणा-यांनाच भाजपने डोक्यावर घेतल्याने येथेही तेच घडणे स्वाभाविक होते. शिवाय, नेताच असे करतो म्हटल्यावर इतरांकडूनही त्याचे अनुकरण होते. दिनकर अण्णांच्या लघु आवृत्त्या निघाव्यात तसे सिडकोतील दोघांनीही पक्षाची मर्जी जाणून न घेता भूसंपादनाप्रश्नी बॅनर्स फडकावलेले दिसून आले. तेव्हा प्रश्न असा आहे की, या अशांना पक्षात रोखणारे वा समजावणारे कुणी आहे की नाही? दुर्दैव असे की, परस्परातील नेतृत्वाची स्पर्धा करताना अन्य नेत्यांनी पाटील यांच्याच खांद्याचा उपयोग करून घेतलेला दिसून आला. शहरातील तीनही आमदारांमधील विसंवादाचा लाभही त्यांना झाला. तेव्हा पाटील यांचे पद काढून घेण्यात आले असले तरी त्यांना हाताशी धरून आपले निशाणे साधून घेतलेल्यांचे काय करणार? पक्षाची शोभा ही काही केवळ पाटील यांच्यामुळेच झाली नसून, त्यांना पुढे करून ‘शह-काटशह’चे पक्षांतर्गत राजकारण करू पाहणारेही कमी दोषी नाहीत. जे पेरले, तेच आज उगवले आहे; हेच याबाबत म्हणता यावे.
पक्षात महिलांचे प्राबल्य, त्यांचा मान व त्यांना दिली जाणारी संधी वाखाणण्याजोगी आहे. शहरातील दोन आमदारक्यामहिलांकडे आहेत. महापौरपदी महिलाच असून, पालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिलेकडे सोपविण्याचे धाडसही पक्षाने मागे दाखविले. या भगिनी चांगलेच काम करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याही वाटेत काटे पेरण्याचे प्रयत्न अनेकांनी केलेले दिसून आले. स्थायीच्या सभापती आम्हाला विश्वासात घेत नाहीत म्हणून पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आदळ आपट केली गेलेली पहावयास मिळाली होती. तेव्हा, अशांचे कान वेळच्यावेळी टोचले जाणार नसतील तर एकट्या दिनकर पाटील यांच्यावरील कारवाईने काय साधले जाईल? परंतु स्थानिक पातळीवर हे होताना दिसत नाही, त्यामुळे पक्षाला न जुमानता आपली ‘जुमलेबाजी’ करण्याचे व ते करणाºयांचे प्रमाण वाढत चालले आहे. भाजपमध्ये ‘काँग्रेस कल्चर’ वाढीस लागल्याची खंत पक्षातील निष्ठावंत बोलूनही दाखवतात; परंतु या संदर्भात बोलायचे कुणाकडे असा त्यांचा प्रश्न आहे. ही निर्नायकी अवस्था दूर सारायची असेल तर आणखीही बदल गरजेचे ठरावेत.

Web Title:  What has been sown by the BJP, that has arisen today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.