नाशिक : प्रत्येक स्त्री-पुरुषाला निसर्गाने दिलेले वैशिष्ट्य त्याच्या विशिष्ट वयाच्या काळातच सर्वोच्च स्तरावर कार्यरत असते. त्यामुळेच महिलांसाठी आई होण्याचे सर्वोत्तम वय हे साधारणपणे २० ते ३० मानले जाते. तर पुरुषांमध्ये हीच मर्यादा ३५ वर्षांपर्यंत चांगली राहात असते, असे तज्ञांचे मत आहे. लग्नानंतरच्या नव्या नवलाईचे दिवस झटकन संपतात. नवविवाहित तरुण-तरुणी इवल्याशा गोड बाळाची स्वप्ने बघायला लागतात. कोणताही अडथळा न येता साधारण ७५-८० टक्के जोडप्यांना लवकरच गर्भधारणेच्या बातमीचा आनंद घेता येतो. परंतु, अनेकदा करिअरमुळे मुलींची विवाहाची वयच ३० पार तर मुलांची वय ३५ पार झालेली असतात. त्यामुळे पती, पत्नीचा संसारच मुळात उशिरा सुरू असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
चाळिशीनंतर अनेक समस्या
ऐशोआरामी सवयी, बैठी जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. त्यामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो. वयाच्या ३५ नंतर जुळी बाळे जन्माला येण्याचाही संभव असतो. जर कुणी ४० व्या वर्षी आई-वडील होण्याचे स्वप्न पहात असाल तर, या वयात गर्भवती राहण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. या काळात गर्भवती महिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याचा संभव असतो. जो होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच योग्य वेळी निर्णय घ्या आणि तुम्हाला कोणत्या वयात आई-बाबा व्हायचे असल्यास योग्य विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.