नाशिक : महापालिकेच्या गणेशवाडी शाळेतून एका माजी विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी मागणीनुसार दाखला दिला खरा; परंतु त्यातील अपूर्ण माहिती आणि केवळ नावाव्यतिरिक्त जातीचा उल्लेख बघितला तर हा दाखला शाळा सोडल्याचा की जातीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्याला दिलेला दाखला त्याला आपल्या पाल्यांसाठी जातीचा दाखला तयार करण्यासाठी पूरक पुरावा म्हणून दिल्याचा दावा केला आहे. पंचवटीत राहणाऱ्या सुनील रामचंद्र सूर्यवंशी यांना हा दाखला देण्यात आला असून हा दाखला देताना केवळ नाव आणि जातीचा उल्लेख आहे. विद्यार्थ्याच्या आईचे नाव, राष्ट्रीयत्व या बाबींचा उल्लेख तर नाहीच शिवाय विद्यार्थ्याला दाखला का दिला, याचा उल्लेख नाही जन्मतारखेसह अनेक रकाने भरलेले नाही. त्यामुळे संबंधित शाळेने दाखला देऊन काय साधले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारचा दाखला देणे कितपत वैध असा प्रश्न असून पालिकेने अपुऱ्या माहितीच्या आधारे दिलेल्या दाखल्याने संबंधिताचे नुकसान होऊ शकते किंवा सोयीची माहिती देऊन गैरप्रकारदेखील होऊ शकतो.यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक अरुणा काकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरची व्यक्ती शाळेत सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी असल्याने त्यावेळेचे दस्तावेज म्हणजे दाखल्याची पुस्तके अत्यंत जीर्ण आणि फाटलेल्या अवस्थेत आहे. परंतु केवळ त्या व्यक्तीला पाल्यांच्या शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याला पुरावा म्हणून पूरक दस्तावेज आवश्यक असल्याने त्यानुसार देण्यात आले आहे. त्यावेळच्या दाखल्यात ज्या बाबी नमूद नव्हत्या किंवा नष्ट झाल्या आहेत त्या देण्यात आलेल्या नाहीत, असे स्पष्ट केले.
हा दाखला शाळा सोडल्याचा की जातीचा?
By admin | Published: February 24, 2016 11:08 PM