नाशिक : विधानसभा व लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपा समर्थक आमदार अपूर्व हिरे यांना मात्र भाजपा या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी देईलच याचा भरवसा नसल्याने की काय त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी आपल्याच सरकारच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी केलेल्या आंदोलनाला स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनिशी हजेरी लावल्यानंतर हिरे यांनी आता रविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर साºयांचेच लक्ष लागून आहे. स्वत: हिरे यांनीच आपल्यातील अस्वस्थता निवडक पत्रकारांसमोर व्यक्त करताना होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाने आपल्याला उमदेवारी दिली तर बरेच नाहीतर निवडणूक तर लढवणारच, असे एकतर्फी जाहीर करताना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची ते ऐनवेळी जाहीर करू, असे सांगून त्याबाबतचे गूढ कायम ठेवले आहे. सहा वर्षांपूर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपूर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधूसह भाजपाच्या व्यासपीठावर हजेरीही लावली. नाशिक जिल्ह्णात एकेकाळी हिरे घराण्याच्या असलेल्या राजकीय वर्चस्वाचा भाजपाला फायदा होईल, असे मानले जात असताना, प्रत्यक्षात भाजपाकडून मात्र हिरे बंधूंना मानसन्मान मिळत नसल्याच्या त्यांच्या समर्थकांच्या भावना आहेत. त्यातूनच आगामी काळातही अपूर्व हिरे यांना पक्षाकडून मंत्री वा महामंडळ मिळेल, अशी आता खात्री दिसत नसल्यामुळेच की काय गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा भाजपाशी दुरावा वाढत चालला असून, त्यातूनच त्यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयात लावलेल्या भाजपा नेत्यांच्या तस्वीरीही अडगळीत टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीची एकप्रकारे माहितीच त्यांनी पत्रकारांसमोर उघड केली. रविवारी नाशिकच्या श्री कालिका मंदिराचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचे आमदार हिरे यांनी जाहीर केले आहे, मात्र आपल्या आमदारकीचा अजून सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, अद्याप भाजपा आपण सोडलेली नाही. परंतु प्रचार करताना भाजपाच्या नावाने नव्हे तर हिरे कुटुंबीयांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाच्या नावेच करण्यात येणार असल्याचे सांगून हिरे यांनी गूढ कायम ठेवले आहे.
अस्वस्थ हिरेंचा भाजपावर भरवसा नाय काय? राजकीय भूमिकेकडे लक्ष : वेगळी चूल मांडण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:10 AM
नाशिक :निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपा समर्थक आमदार अपूर्व हिरे यांना मात्र भाजपा या निवडणुकीत उमेदवारी देईलच याचा भरवसा नसल्याने की काय त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
ठळक मुद्देरविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचारभाजपाशी दुरावा वाढत चालला