नाशिक : पदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार वसंत गिते यांची सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ‘हे ठाकरे काय आणि ते ठाकरे काय’ अशी समजूत घालीत शिवसेनेत येण्याची खुली आॅफर दिली, तर भाजपाचेही आमदार बाळासाहेब सानप व विजय साने यांनी गिते यांच्याशी गुफ्तगू करीत पक्षश्रेष्ठंींशी प्रवेशाबाबत चर्चा केली. दरम्यान, नाराज गिते यांनी घरातच दिवस घालवला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली किंवा नाही हे मात्र कळू शकले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार वसंत गिते यांनी सोमवारी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव दिल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या राजीनामा नाट्यामागची कारणमीमांसा प्रत्येक जण आपापल्यापरीने करीत असतानाच, गिते पदाबरोबरच आता मनसेलाही सोडचिठ्ठी देतील. अशी अटकळ बांधून शिवसेना, भाजपाने त्यांच्याभोवती गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कालच गिते यांच्याशी संपर्क साधून ‘भाजपाचा विचार करा, केंद्रात व राज्यात पक्षाची सत्ता आहे’ याची जाणीव करून देत विचार करण्यासाठी अवधी दिला, तर मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, चंद्रकांत लवटे, मामा ठाकरे, शिवाजी सहाणे, विलास शिंदे यांनीही गिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व जुने घर, जुना वाडा आपलाच आहे असे सांगत शिवसेनेत येण्याची आॅफर दिली. गिते यांनी सेनेला थेट दुजोरा दिलेला नसला, तरी स्पष्टपणे नकारही दिलेला नाही; मात्र समर्थकांशी बोलावे लागेल एवढे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती मामा ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सेनेची मंडळी गिते यांना भेटून बाहेर पडत नाही तोच भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, विजय साने यांनीही गिते यांची भेट घेऊन भाजपाच्या प्रवेशाची चर्चा केली. यावेळी मनसेचे समीर शेटे, अॅड. अभिजित बगदे उपस्थित होते. वरवर चर्चा झाल्यानंतर गिते यांनी सानप, साने यांच्याशी बंद खोलीआड सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या चर्चेत काय घडले हे समजू शकले नसले, तरी साने यांनी मात्र सानप यांच्या खासगी कामासाठी आम्ही गिते यांना भेटल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गिते यांना सोमवारीच भाजपात येण्याचे आमंत्रण दिल्याचेही साने म्हणाले.
‘हे ठाकरे काय आणि ते ठाकरे काय?’
By admin | Published: November 04, 2014 11:55 PM