श्याम बागुलनाशिक : मुंबईच्या माझगाव या कामगार व मध्यमवर्गीय वस्तीतून श्रीगणेशा करून राज्याच्या राजकारणावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे छगन भुजबळ यांना थेट येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचे आवतण देणाऱ्या माणिकराव शिंदे यांच्याकडून यंदा भुजबळ यांनीच आपल्यासाठी येवला मतदारसंघ सोडण्याची मागणी केली जावी व त्याचवेळी लगतच्या वैजापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भुजबळ यांनी वैजापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी थेट येवल्याची पायधूळ झाडावी या दोन्ही गोष्टी निव्वळ योगायोग मानाव्या की बदललेल्या राजकीय समीकरणांचा भाग ? मुळात येवल्याची राज्यात ओळख करून दिली ती छगन भुजबळ यांनी. त्यामुळे येवला मतदारसंघाची मागणी करून माणिकराव स्वत:ची ओेळख निर्माण करू पहात आहेत की, येवल्याची पिछेहाट हादेखील प्रश्न निर्माण होत आहे.
वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या राजकीय व नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळी मतदारसंघाची निवड करतो म्हटल्यावर सर्वांच्या भुवया ताणल्या जाणे स्वाभाविक होत्या. भुजबळ यांनी मतदारसंघाला प्राधान्य दिले म्हटल्यावर येवल्याच्या राजकारणावर भिस्त ठेवून असलेल्यांच्या उरात धडकी भरणे साहजिकच असल्यामुळे त्यावेळी उलट सुलट प्रतिक्रिया उमटून राजकीय आंदोलनांची खेळीही खेळली गेली. भुजबळ यांना येवल्यातून निवडून आणण्यासाठी जसा एक स्थानिक गट कार्यरत होता, तसा दुसरा गट कटकारस्थानातदेखील कायम होता. तशाही अवस्थेत भुजबळ प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले, त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही झपाट्याने बदलली. राज्याचे नेतृत्व करावयास निघालेल्या भुजबळ यांच्या राजकीय छायेखाली सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते कधी विसावले हेदेखील लक्षात आले नाही. येवल्याचा कायापालट सुरू झाला. प्रसंगी नाशिककला विकासाच्या तुलनेत दुय्यम स्थान देऊन येवल्याचा कायापालट करण्यास भुजबळांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. विरोधकांनी तोंडात बोटे घातली तर स्वकीयांनीदेखील भुजबळ यांनी आता येवल्याप्रमाणे अन्य मतदारसंघातही लक्ष घालावे असे टोमणे जाहीरपणे मारून अप्रत्यक्ष येवल्याच्या विकासावर शिक्कामोर्तब केले. येवल्याचा झपाट्याने होणारा विकास पाहून लगतच्या नांदगाव मतदारसंघालाही हेवा वाटला, परिणामी भुजबळ पुत्र पंकज यांनाही या मतदारसंघाने आपलेसे केले. येवल्याच्या वेळी जसा भुजबळांच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न झाला, त्याची पुनरावृत्ती नांदगावातही राजकारण्यांकडून झाली, मात्र विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मतदारांनी राजकारण्यांना भीक न घालता भुजबळांना आपलेसे केले. गेल्या पंधरा वर्षांपासून भुजबळ यांनी दोन्ही मतदारसंघाचे पालकत्व निभावले, मध्यंतरीच्या काळात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट पाहून भुजबळ संपल्याची जी काही आवई उठविली गेली त्यातून भुजबळ विरोधकांचे फावले व येवला मतदारसंघात आता भुजबळ नको म्हणून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्याची सुरुवात राष्टÑवादीचेच माणिकराव शिंदे यांनी केली. वृत्तपत्रातून जाहिरात देऊन त्यांनी आपल्या सुप्त भावना जाहीर केल्या व त्यात भुजबळ यांनी थांबावे व आपल्यासाठी जागा सोडावी असा हेतू त्यांनी बोलून दाखविला. भुजबळ यांनी का थांबावे याचे फारसे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही, किंबहुना शिंदे यांनी पुढची चिखलफेक थांबविण्यासाठी भुजबळ यांनीच आपल्या मागणीवर बोलावे, अन्य कोणाकडून अपेक्षा नसल्याचेही सांगून टाकल्यामुळे शिंदे यांच्या मागणीने खूप मोठी राजकीय राळ उठली नाही, मात्र दीड दशके येवला मतदारसंघासाठी झटूनही जर अशा प्रकारची मागणी होणार असेल तर भुजबळ यांना वाईट वाटणे साहजिकच होते व आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मागणीवर भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन पाळले, त्यामुळे मनात सत्तेची मांडे खाणाऱ्यांनी काही काळ तृप्तीचे ढेकरही दिले. परंतु त्याचवेळी लगतच्या वैजापूर मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्या, कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याची बाब नक्कीच येवलेकरांना सणसणीत चपराक हाणून गेली. भुजबळ नको म्हणून आजवर ज्यांनी ज्यांनी राजकीय ताकद अजमावून पाहिली त्यांना येवल्याच्या मतदारांनी जागा दाखवून दिली आहे, खुद्द माणिकराव शिंदे यांनीदेखील भुजबळ यांच्या विरोधात लढा देऊन स्वत:ची राजकीय ताकद अजमावून पाहिली आहे. अशा वेळी त्यांनी येवला मतदारसंघातून भुजबळ यांच्याऐवजी स्वत:ची उमेदवारी पुढे करणे म्हणजे जरा अतीच झाले आहे. भुजबळ यांचे राज्यातील राजकारणातील स्थान पाहता, त्यांना येवलाच काय अन्य कोणताही मतदारसंघ निवडणुकीसाठी अवघड नाही, मात्र येवल्यापासून भुजबळ यांचे नाव वेगळे केल्यास येवल्याची ओळख ती काय? राहिला प्रश्न माणिकराव शिंदे यांचा त्यांनी येवल्याची मागणी करून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला खरा, पण या मागणीचे वास्तव स्वत: शिंदे जाणून आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की, एकदा राजकीय ताकद अजमाविलेले शिंदे यांच्या शिडात पुन्हा हवा भरून त्यांचा राजकीय बळी घेण्यामागे कोणाचा हात आहे?