नाशिक : कोरोना संकटामुळे गतवर्षात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. तशा दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत, तर राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या निकालाच्या आधारे व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणदान करून दहावीचा निकाल जाहीर केला खरा. परंतु , निकाल जाहीर करण्यात जून उलटून गेला. त्यामुळे आता शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्याध्यापकही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे यासंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी यांच्याशी संपर्क साधला असून मुख्याध्यापकांना आता शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा लागली आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर तारीख व शेरा काय लिहायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात सोमवारपर्यंत (दि. १९) परिपत्रक काढले जाणार असल्याची माहितीही त्यांनी अन्य मुख्याध्यापकांना दिली होती. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कोणतेही पत्र काढले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम कायम असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे शाळांवर दाखले तयार करण्याचे काम वाढले आहे. त्यामुळे दाखले तयार करण्यास सुरुवात करण्यासाठी शाळा सोडल्याची तारीख व शेरा याविषयी शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्ट सूचना कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.
पॉइंटर
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा - १०९०
दहावीच्या परीक्षेला प्रवीष्ट विद्यार्थी - ९२,२३६
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ९२,२१०
कोट-
दहावीचा निकाल लागला असून दाखले देण्याचे काम आता सुरू होईल, त्याबाबत दाखल्यावर शाळा सोडल्याची तारीख काय लिहावी आणि शेरा काय लिहायचा याबाबत अजूनही अनेक मुख्याध्यापकांच्या मनात संभ्रम आहे. यासंदर्भात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले असून शिक्षण उपसंचालकांचे पत्र मिळाल्यानंतरच याविषयी पुढील कार्यवाही करावी.
- एस. के. सावंत, अध्यक्ष, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ.