नाशिक : कोरोना संकटामुळे गतवर्षात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. तशा दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत, तर राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या निकालाच्या आधारे व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणदान करून दहावीचा निकाल जाहीर केला खरा. परंतु , निकाल जाहीर करण्यात जून उलटून गेला. त्यामुळे आता शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा? असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्याध्यापकांसोबत विद्यार्थी व पालकही संभ्रमात पडले आहेत. यासंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक यांना संपर्क साधत समस्यांची माहिती दिली आहे. दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे कामकाज सुरू होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर तारीख व शेरा काय लिहायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.
पॉइंटर-
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा-१०९०
दहावीतील विद्यार्थी-९८,९४९
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ९२,२१०
पास झालेले मुले-४९,४२७
पास झालेल्या मुली- ४२,७८३
मुख्याध्यापक म्हणतात
कोट-
दहावीचा निकाल लागला असून, दाखले देण्याचे काम आता सुरू होईल, त्याबाबत दाखल्यावर शाळा सोडल्याची तारीख काय लिहावी आणि शेरा काय लिहायचा याबाबत अजूनही अनेक मुख्याध्यापकांच्या मनात संभ्रम आहे. यासंदर्भात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले असून, शिक्षण उपसंचालकांचे पत्र मिळाल्यानंतरच याविषयी पुढील कार्यवाही करावी.
- एस. के. सावंत, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
कोट-
दहावी उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले शाळांनी तयार करून ठेवले आहे. त्यावर केवळ तारीख आणि शेरा लिहायचे काम बाकी आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या निर्देशांची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रत हातात मिळाल्यानंतर दाखला दिला जातो. जोपर्यंत शिक्षण विभागाकडून यासंदर्भात स्पष्ट सूचना मिळणे अपेक्षित आहे.
किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक, नवरचना विद्यालय
---
पालक म्हणतात...
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शेरा काय मिळणार? असा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या निकालावर कोरोनाचा परिमाण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचा विचार करून दरवर्षाप्रमाणेच शाळा सोडण्याचे दाखले मिळावेत.
अंजली पवार, पालक
विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख किंवा शेरा या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव दिसून आला तर भविष्यातही विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याच्या गुवत्तेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. याचा विचार करून शिक्षण विभागाने योग्य तो निर्णय घ्यावा.
- राजेश जाधव, पालक
---
दाखल्यांसंदर्भात स्वतंत्र परिपत्रक
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुख्याध्यापकांनी एसएसएसी परीक्षा उत्तीर्ण, असा शेरा लिहावा. त्याचप्रमाणे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्याची तारीख दाखल्यावर टाकायला हवी, यासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय स्वतंत्र परिपत्रक काढून स्पष्ट सूचना करणार आहे.
- नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग