लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील डॉक्टर्स, उद्योजक, महाविद्यालयीन तरुणींचे व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, ईमेल अकाउंट हॅक करून अश्लील संदेश पाठविणाऱ्या हॅकर दीप्तेश सालेच्याविरोधात पुण्यातील तीन व गुजरातमधील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे़ दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता १२ जुलैपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे़शहरातील प्रतिष्ठित महिला डॉक्टर्सचे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे व त्यावरून अश्लील संदेश पाठविले जात असल्याचा प्रकार २८ जून रोजी उघडकीस आला होता़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या हॅकरचा माग काढून संशयित दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा यास राजस्थानातील जसोलगाव येथून अटक केली़ सालेचा याने मानसिक विकृतीतून केवळ नाशिकच्याच नव्हे तर पुणे, मुंबई, गुजरात व राजस्थानातील महिलांचेही व्हॉट्सअॅप हॅक केल्याचे पोलीस तपासात समोर आले़हॅकर सालेचा यास न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ पोलिसांच्या तपासात त्याच्याविरोधात पुण्यातील कोंढवा, मार्केट यार्ड व वानवडी तसेच गुजरातमधील साबरमती पोलीस ठाण्यात हॅकिंगचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे़तसेच त्याने ईमेलही हॅक केल्याचे समोर आले असून, या तपासासाठी १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, नाशिक पोलिसांच्या तपासानंतर सालेचा यास पुणे व गुजरात पोलीस ताब्यात घेणार आहेत़
व्हॉट्सअॅप हॅकरच्या कोठडीत वाढ
By admin | Published: July 08, 2017 12:52 AM