नाशिक : कोरोनामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विविध प्रकारच्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असून त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना घरातील मासिक किराणा मालाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागतो आहे. डाळ मील चालकांनी केलेली भाववाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढता खर्च आणि मजुरांची अपुरी संख्या यामुळे ही भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत असून लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडे किराणा मालाचा असलेला साठा आणखी काही दिवस राहणार आहे. त्यामुळे बहुतेक किराणा मालाचे भाव वाढत असून काबुली चना, उडीद डाळीची आयात बंद असल्याने काही प्रमाणात भाववाढ झाली असून अन्य डाळींच्या होलसेल दरातही गेल्या आठडाभरात वाढ झाल्याने बाजारात डाळी तेजीत आल्या आहेत. संचारबंदीच्या काळातही ग्राहकांकडून मॅगी, चायनीज वस्तूंचीही मागणी होत आहे. तुलनेत अशा प्रकारच्या ‘रेडी टू कूक’ पदार्थांचा पुरवठा तुलनेत कमी असल्याने अशा वस्तुंचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, संचारबंदी अफवांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये घबराट असल्याने, त्याचा फायदादेखील काही व्यापारी व दुकानदार घेत आहेत. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक परतीच्या प्रवासाचेही भाडे आकारत आहेत. तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गहू येत असल्यामुळे तेथील धान्य मंडई बंद असल्याचा परिणामही गहू दरवाढीवर होत आहे.
आणखी दरात वाढ होण्याची शक्यता ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आकारत असलेले रिटर्नचे भाडे, परराज्यातील धान्याची बंद असलेल्या मंडई, डाळ मिलचालकांनी केलेल्या भाववाढीमुळे डाळीचे, तेल आणि गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाउन वाढल्यास आणखी दरात वाढ होण्याची शक्यता घाऊक धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.