कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूंसाठी जिल्हा प्रशासनाने खास खालसानिहाय शिधापत्रिका वितरित केल्या आहेत. साधुग्राममध्ये तात्पुरती रेशन दुकानेही उभारण्यात आली आहेत. प्रतिव्यक्तीसाठी दरमहा तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तर अर्धा किलो साखर असा कोटा मंजूर करण्यात आला आहे; मात्र सदर प्रमाण अपुरे असल्याच्या साधूंच्या तक्रारी आहेत. याशिवाय प्रशासनाकडून पुरवले जाणारे गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यांत किडे आढळून येत आहेत. सदर गहू खाण्यायोग्य नसल्याचे साधूंचे म्हणणे आहे, तर रेशनच्या साखरेचे अद्याप दर्शनही घडले नसल्याचे काही साधू सांगत आहेत. रेशन दुकानांत गेल्यानंतर साखर शिल्लक नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळत आहेत. अनेक खालशांमध्ये दोन्ही वेळ अन्नछत्रे सुरू असून, हजारो भाविक त्यांचा लाभ घेत आहेत. या अन्नछत्रासाठी प्रशासनाच्या धान्य व साखरेचा कवडीचाही उपयोग होत नसल्याचे साधू सांगत असून, याबाबत सेक्टर दोनमधील गणेशदास महाराज व अन्य साधू-महंत प्रशासनाकडे तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)
गव्हात किडे, साखर मिळेना!
By admin | Published: September 07, 2015 11:01 PM