साकोरा : नांदगाव तालुक्यातील जामदरी येथून उसाची वाहतूक करणारा ट्रकने फाट्याजवळ येताच पेट घेतला. सोमवारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ट्रक व ऊस जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गावकºयांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले व चालकाचे प्राण वाचवले. चाळीसगाव येथील सुरेश भास्कर खैरनार या चालकाने नेहमीप्रमाणे सोमवारी जामदरी येथील भगवान भीमराव देशमुख या शेतकºयाचा ऊस ट्रकमध्ये (क्र. एमएच १८ एए ०५२२) भरून कोळपेवाडी साखर कारखान्यासाठी घेऊन जात होता. गाव सोडून चढ चढल्यानंतर वायरिंग जळाल्या सारखा वास आल्याने त्यास शंका आली. त्याने ट्रक थांबवून तपासणी केली मात्र क्लीनर नसल्याने त्याची चांगलीच फजिती झाली. तो पुन्हा निघण्याच्या तयारीत असतांना ट्रकने अचानक पेट घेतला.चालकाला वाचविलेट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच शेजारील मळ्यात काम करत असलेल्या काही शेतकºयांसह महिलांना धाव घेतली. त्यांनी त्वरित चालकाला ट्रकमधून बाहेर काढले. जवळच राहत असलेले सुनील सुरसे यांनी परिसरातील नागरिकांना फोन करून माहिती दिली. जामदरी गावातून आलेल्या काही नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नांदगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
जामदरी फाट्यावर उसाचा ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:41 AM