नाशिक : गेल्या महिन्यात रेशन मधून मिळणा-या गव्हात कपात करून शासनाने शिधापत्रिकाधारकांना सक्तीने मक्याची रोटी खाण्यास भाग पाडल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मात्र रेशनमधून नियमितपणे गहू देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला असून, सध्या सुरू असलेल्या नवीन मक्याच्या खरेदीनंतर पुढच्या महिन्यापासून पुन्हा रेशनमधून मका देण्यात येणार आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ३० हजार क्विंटल मक्याची रेशनमधून विक्री करण्यात आली आहे.राज्य सरकारने आधारभुत किंमतीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणा-या पंधरा किलो गव्हात कपात करून त्याऐवजी चार किलो मका देण्यात आला. एक रूपया किलो या प्रमाणे शिधापत्रिकाधारकांना मक्याचे वाटप करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात मका उत्पादन घेण्यात येत असले तरी, जेवणातून मका खाल्ला जात नाही. परंतु शासनाने सक्ती केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांचा नाईलाज झाला. शासनाने खरेदी केलेल्या एकूण ३८ हजार क्विंटल पैकी डिसेंबरमध्ये रेशन दुकानातून ३० हजार क्विंटल मक्याची विक्री करण्यात आली. अजुन जवळपास ८ हजार क्विंटल मका शासनाकडे शिल्लक आहे. सध्या आधारभुत किंमतीत जिल्ह्यातील दहा केंद्रावर मक्याची खरेदी केली जात असून, हा खरेदी केलेला मकाही शासनाने रेशनमधूनच विक्री करण्याचे ठरविले आहे. जानेवारी अखेर पर्यंत मक्याची खरेदी संपुष्टात आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पुन्हा मका देण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापुरते मक्याचे वाटप न करण्याचे ठरविण्यात आले असून, शिधापत्रिकाधारकांना नियमित पंधरा किलो गहू देण्यात येणार आहे.
चालू महिन्यात मका ऐवजी मिळणार गहू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:36 PM
राज्य सरकारने आधारभुत किंमतीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणा-या पंधरा किलो गव्हात कपात करून त्याऐवजी चार किलो मका देण्यात आला.
ठळक मुद्दे३० हजार क्विंटलचे वाटप : फेब्रुवारीत पुन्हा मक्याची रोटी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात ३० हजार क्विंटल मक्याची रेशनमधून विक्री