नाशिक : गेल्या चार वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांना दिले असून, पुढील आठवड्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नासाका कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे ८४ कोटी रुपये कर्ज थकीत झाल्याने बॅँकेने कारखान्यास अर्थपुरवठा करण्यास असमर्थता दाखवल्याने गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप यांनी शासनाकडे कारखाना सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता. सहकारमंत्र्यांच्या आदेशान्वये साखर आयुक्तांनी गेल्या आठवड्यात संचालक मंडळाकडून कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी करणेबाबत प्रस्ताव मागितला होता. त्याला कामगारांनी प्रतिसाद देत सुमारे ११ कोटींची देणी मागणार नसल्याचा लेखी करार करून दिला. राज्य बॅँक नासाकाला संचालकांच्या हमीवर पूर्व हंगामी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत आदेशित केले आहे. सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांना आदेशित करत नासाका सुरू करण्याचे स्पष्ट केले असून, संचालक सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.संचालकांची मालमत्ता तारणनाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी वसाकाच्या धर्तीवर नासाका राज्य बॅँक व जिल्हा बॅँक यांच्यात त्रिपक्षीय करार करणार असून, प्रती पोते टॅगिंग केले जाणार आहे. राज्य बॅँकेने कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर ते फेडण्याची जबाबदारी संचालक मंडळाने स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून घेतली आहे.
नासाकाची चाके फिरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:38 AM