नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे.गेल्या २0 ते २५ दिवसांपासून संचारबंदीमुळे रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा कसा ओढावा, असा प्रश्न या रिक्षाचालकांसमोर असून, कुटुंबाची उपासमार होत आहे. काहींचे घरांचे हप्ते थकले असून, कुणाच्या घरात किराणा संपल्यामुळे त्यासाठी पुरेसे पैसेदेखील नाहीत. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, तसेच काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेमध्ये रिक्षाचा समावेश करून आम्हाला त्यात सहभागी करून घ्यावे, असे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या रिक्षाचालकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याची खंत अनेक रिक्षाचालकांनी बोलून दाखविली.विशेषत: रिक्षाचालकांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. सर्वसामान्य रिक्षाचालकाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी, अशी मागणी शहरातील रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.-------------------प्रत्येक रिक्षाचालकाचे कमीत कमी चार ते पाच जणांचे कुटुंब आहे. त्यांची सध्या उपासमार होत असून आर्थिककोंडी झाली आहे. रिक्षाचालकांनी मदत कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचा दैनंदिन खर्च, आजारपणात येणारा खर्च करायला पैसे नाहीत. घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय? महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केलेली आहे, परंतु त्याच्यात रिक्षाचालकांचा उल्लेख कोठेही नाही, याची खंत वाटते. - सचिन पगारे, पंचवटी---------------------घराचे हप्ते थकले आमच्या संसाराचा गाडा हा रिक्षावरच अवलंबून असल्याने रिक्षा चालली तर आमचा संसार चालतो. आता सर्वच व्यवसाय व्यवहार ठप्प झाल्याने पैसे आणणार कुठून, त्यात घराचे हप्ते थकले आहेत. तसेच रिक्षाचे हप्तेदेखील बाकी आहे. आम्हाला रहदारीला परवानगी मिळावी, आम्ही नियम पाळून व्यवसाय करू.- विनोद भावसार, म्हसरूळ--------------------------सरकारने मार्ग काढावा गेल्या २0 ते २५ दिवसांपासून रिक्षा वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही घरीच बसून आहोत, दुसरा कोणताच उद्योग व्यवसाय करणेदेखील शक्य नाही. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मुलाबाळांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीदेखील पैसे नाहीत. सरकारने यातून मार्ग काढावा आणि आम्हाला मदत करावी.- विजय अहिरे, उपेंद्रनगर, सिडको
रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 10:17 PM