देवळाली कॅम्प : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली. विशेष म्हणजे रस्त्यातील खड्डे व त्यामुळे विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेत अडकलेली रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी जवळील एका हॉटेलमधील मालक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने तब्बल दोन तासांनंतर रुग्णवाहिका गर्तेतून बाहेर पडली. सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान संगमनेर येथून रुग्णाला खासगी दवाखान्यातून घेऊन रुग्णवाहिका मुंबईच्या दिशेने सिन्नर-घोटी मार्गाने निघाली होती. सात वाजेच्या सुमारास पांढुर्लीच्या पुढे रस्त्याच्या खड्ड्यांनी रुग्णवाहिकेचा वेग मंदावला. ८ वाजता रुग्णवाहिका खड्ड्यातून मार्ग काढत मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना हॉटेल कुबेर लक्ष्मीजवळ रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकून पडली. चालकाने अथक प्रयत्न करूनही गाडी खड्ड्यातून बाहेर पडत नसल्याचे पाहून रुग्णासोबत असलेल्या नातेवाइकांची पाचावर धारण बसली, तर रुग्णाची प्रकृतीही खालावू लागल्याचे पाहून त्यांनी रुग्णवाहिकेतून उतरून जवळील हॉटेलकडे धाव घेत मदतीची विनंती केली. यावेळी हॉटेलचे मालक राहुल सोनवणेंसह हॉटेलमधील कर्मचाºयांनी रुग्णवाहिकेकडे धाव घेत प्रयत्न सुरू केल्याने जवळपास दोन तासांनंतर रुग्णवाहिका खड्ड्यातून कशीबशी बाहेर काढून मार्गस्थ करून दिली. घोटी-सिन्नर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याने अवजड वाहने मार्गस्थ करीत असल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय मंदावली आहे. या खड्ड्यांकडे कायमच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असून, काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला, परंतु त्यानंतर लगेचच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. घोटी-सिन्नर या शिर्डी जोडणाºया महामार्गावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संबंधित विभागाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी प्रयत्न केले जात असताना जुना रस्त्याच्या दुरुस्तीअभावी अनेकांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे.- राहुल सोनवणे, प्रवासी
घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:49 AM