नाशिक : शूज गेटजवळच काढा, परीक्षा पॅड शक्यतो पारदर्शक आणा अशा विविध सूचनांचे पालन करत शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. मराठी माध्यमाची शुक्रवारपासून तर इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेस शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी शहरातील विविध शाळांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. याशिवाय केंद्रनिहाय त्यात अधिकाधिक भर घातली जात असल्याचे दिसून आले.शहरातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी चक्क शूज गेट जवळच काढावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना या नियमाची माहिती नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी येताना पायात शूज घालून आले होते. ऐनवेळी हा नियम कळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशव्दाराजवळच शूज, सॉक्स काढून परीक्षा केंद्रात जावे लागले. मुलांना सोडविण्यासाठी आलेले पालकही या नियमामुळे बुचकळ्यात पडले. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा नियम चांगला असला तरी त्याची शाळेने पूर्वकल्पना द्यायला हवी होती, अशी चर्चा पालकांमध्ये होती.
परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:24 AM