-----
नाशिकरोड : शहर पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त दीपक पांडेय सोमवारी (दि.१०) त्यांच्या खास शैलीत नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा चौकात असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर अवतरले. यावेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. अवघ्या काही मिनिटांत पांडेय यांनी त्यांना धीर देत त्यांच्यासोबत 'ड्युटी'ला प्रारंभ केला. ही बाब नाशिकरोड पोलीस वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली अन् या पॉईंटवर सगळेच अधिकारी मग धावून आले.
नाशिक शहरात दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर झाला असून बुधवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याची सर्वधिक जबाबदारी पोलिसांवर असणार आहे. नाशिकरोड परिसर हा अत्यंत संवेदनशील असा आहे. आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांसह रेल्वे स्थानक या भागात आहे. त्यामुळे येथील पोलिसांशी पांडेय यांनी सर्वप्रथम संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आणि बंदोबस्ताचे विविध बारकावे समजावून देत सूचना केल्या.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी सायंकाळी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील चेकपोस्टवरील पोलिसांबरोबर ड्युटी केली. पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाबाबतच्या नियमावलींचे नागरिक पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी-अधिकारी सध्या जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्यामागे पोलीस प्रशासन प्रमुख या नात्याने मी खंबीरपणे उभा असल्याचे यावेळी पांडेय म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. अविश्रांत ड्युटीमुळे त्यांचा ताण वाढला आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये ड्युटी करताना सात तर यंदा पाच पोलीस कर्मचारी आतापर्यंत शहीद झाले आहेत हे लक्षात घेऊन पोलीस दल हे माझे कुटुंब असून कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी उपायुक्त विजय खरात, संजय बारकुंड, सह. आयुक्त मोहन ठाकूर, समीर शेख, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ, नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे गणेश न्याहदे आदी उपस्थित होते.